esakal | ब्रेकिंग न्यूज : कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अपात्र!
sakal

बोलून बातमी शोधा

VIDHAN-SABHA-2019

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 27 नामनिर्देशन अर्ज दाखल कऱण्यात आले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे 23 नामनिर्देशन पत्र पात्र ठरले असून, 4 उमेदवारांचे 4 नामनिर्देशन पत्र बाद करण्यात आले आहेत.

ब्रेकिंग न्यूज : कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अपात्र!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (शुक्रवार, ता.4) शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून दाखल केलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. अपूर्ण शपथपत्र, अनामत रक्कम, अर्जामधील सर्व रकाने पूर्ण न केलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. 

कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. रोहित यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता. ते कर्जत तालुक्यातील रहिवासी आहेत. 

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 27 नामनिर्देशन अर्ज दाखल कऱण्यात आले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे 23 नामनिर्देशन पत्र पात्र ठरले असून, 4 उमेदवारांचे 4 नामनिर्देशन पत्र बाद करण्यात आले आहेत.

पात्र उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

रामदास शंकर शिंदे- भाजप, रोहित राजेंद्र पवार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शंकर मधुकर भैलुमे- बसपा, अरुण हौसराव जाधव- वंचित बहुजन आघाडी, आप्पासाहेब नवनाथ पालवे- मनसे, सोमनाथ भागचंद शिंदे- जनहित लोकशाही पार्टी, अशोक सर्जेराव पावणे- अपक्ष, उत्तम फकिरा भोसले- अपक्ष, किसन नामदेव सदाफुले- अपक्ष, गोविंद लक्ष्मण आंबेडकर- अपक्ष, बजरंग मनोहर सरडे- अपक्ष, महारुद्र नरहरी नागरगोजे- अपक्ष, राम रंगनाथ शिंदे- अपक्ष, सुमीत कन्हय्या पाटील- अपक्ष, शहाजी राजेंद्र काकडे- अपक्ष, ज्ञानदेव नरहरी सुपेकर- अपक्ष 

वरील सर्व उमेदवार हे निवडणूक लढविण्यास पात्र ठरलेले उमेदवार आहेत.

अपात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : 

शेख युनूस दगडू, रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी तालुका- पाटोदा), रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे
यापैकी शेख युनूस दगडू आणि रोहित राजेंद्र पवार यांनी अपूर्ण शपथपत्र दिल्याने ते अपात्र ठरले आहेत. तर रावसाहेब मारुती खोत यांनी अनामत रक्कम अपुरी भरली आहे.

तसेच आशाबाई रामदास शिंदे यांचा भारतीय जनता पक्षाचा पर्यायी उमेदवार म्हणून नमुना ब मध्ये उल्लेख आहे. परंतु मुख्य उमेदवाराचा अर्ज पात्र झाल्याने त्यांना अपक्ष उमेदवारासाठीची आवश्यक असणारी पात्रता पूर्ण करता आली नाही. त्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार आणि अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल केलेले रोहित राजेंद्र पवार (सध्या रा. ता. कर्जत, मूळ रा. पिंपळवाडी, ता. पाटोदा) यांच्या नावात साम्य आहे. परिणामी, राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

- Vidhan Sabha 2019 : उर्मिला मातोंडकर काँग्रेसचा प्रचार करणार?

- जवान चंदू चव्हाण यांचा लष्कराचा राजीनामा