Vidhan Sabha 2019 : ‘माईक असू दे आपलं सगळं उघड असतयं,’ अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल!

टीम ई-सकाळ
Saturday, 5 October 2019

फोन आल्यानंतर उपस्थितांनी माईक बंद करण्याच्या सूचना दिल्या त्यावर ‘असू दे आपलं सगळं उघड असतयं,’ असा टोला अजित पवार यांनी लगावाला.

पुणे : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्याशिवाय पान हालत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. एका उमेदवाराचा अर्ज भरल्यानंतर तेथे उपस्थित समर्थकांसमोर भाषण करताना, अजित पवार यांना दुसऱ्या एका उमेदवाराचे तीन फोन आले. अखेर भाषण थांबवून अजित पवार यांनी त्या उमेदवाराचा फोन उचलला. या प्रसंगाची सध्या पुणे जिल्ह्यात खूप चर्चा आहे. फोन आल्यानंतर उपस्थितांनी माईक बंद करण्याच्या सूचना दिल्या त्यावर ‘असू दे आपलं सगळं उघड असतयं,’ असा टोला अजित पवार यांनी लगावाला.

पाकिस्तानातून सुटका झालेले जवान चंदू चव्हाण यांचा अखेर राजीनामा

उर्मिला मातोंडकर काँग्रेसचा प्रचार करणार?

आणि भाषण थांबवले
विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम वेळ असल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यातील विविध भागातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत वारंवार फोन येत होते. इंदापूर ते राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या सभेत अजित पवार भाषण करत होते. भाषण करत असताना त्यांना फोनचा अडथळा व पुढच्या उमेदवाराची निश्चिती करण्यातच बराच काळ गेला. त्या दरम्यान एकदा नव्हे तर,  तीन वेळा फोन घेत अजित पवार यांनी भाषण थांबवले.‌

'तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या'
अजित पवार यांना येणारा फोन होता भोसरीचे विलास लांडे यांचा. वारंवार फोन येत असल्यामुळं अजित पवार यांनी अखेर भाषण थांबवलं. फोन उचलला आणि 'तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या', असे स्पष्ट सांगितले. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने मला समजून घ्या, असा टोला अजित पवार यांनी लगावला. पवार म्हणाले, 'विलास लांडे आता मला विचारत आहेत. अर्ज भरू का? शेवटची पाच मिनिटं उरली आहेत. इतके दिवस मी कुठं अडवलं होतं आणि विलास लांडे आणि इंदापूरचा काय संबंध आहे, हे मला समजले नाही. मागील वेळीही मी इंदापुरात आल्यानंतर मला असाच त्यांचा फोन येत होता. त्यावेळेसही माझं भाषण सोडून फोनवरील संभाषणच सगळ्या महाराष्ट्रात दाखवण्यात आलं.' त्यावेळी अजित पवार यांनी फोन ठेवून ‘राजकारण यालाच म्हणतात’, अशी राजकारणाची व्याख्या सांगितली होती. इंदापूरकर विसरलेले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 ncp leader ajit pawar indapur speech vilas lande phone