
उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य; फडणवीसांचं मिश्किल विधान
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात चांगलीच जुंपली आहे. फक्त नेतेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांवरही टीका केली जात आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना त्यांच्या गाण्यावरून टोला लगावला होता. यावरच देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे.
हेही वाचा: "१८५७ च्या युद्धात तात्या टोपे, झाशीच्या राणीसोबत मीही..."; फडणवीसांचा टोला
राज्यातल्या विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) आपली पत्नी आणि उद्धव ठाकरेंमध्ये साम्य असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीसांना लगावलेल्या टोल्याबद्दल भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीवर उत्तर देणं सोडत नाही. मला असं वाटतं की उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे. आणि असं काही आलं तर माझ्या पत्नीनीही त्याला उत्तर द्यायला नको, असं माझं मत आहे. अर्थात तो त्या दोघांचा प्रश्न आहे, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही."
हेही वाचा: ''मला सुद्धा धक्का होता, की...'', अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना गाण्यावरून टोमणा लगावला होता. महाराष्ट्र दिनानिमित्त आय़ोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी गाणं गायलं. त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, मला आत्तापर्यंत हे वाटत होतं की एकच व्यक्ती गाणं गाते. यालाच प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईची आठवण करून दिली. अमृता फडणवीस म्हणाल्या की, मलाही धक्का होता, मला वाटत होतं अब्जाधीश फक्त आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊसुद्धा अब्जाधीश आहे. छान, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात!
Web Title: Uddhav Thackeray Devendra Fadnavis Amruta Fadnavis Tweet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..