Shivsena : उद्धव ठाकरेंसमोर पक्षाचं नाव अन् चिन्हासाठी असतील हे 2 पर्याय Uddhav Thackeray will have 2 options for shivsena party name and symbol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

Shivsena : उद्धव ठाकरेंसमोर पक्षाचं नाव अन् चिन्हासाठी असतील हे 2 पर्याय

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे पहिला पर्याय आहे, तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणं आणि उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात गेल्यास आता शिंदे गटाविरोधात नाही, तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाविरोधात जावं लागणार आहे. कारण हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला तर निवडणूक आयोगाला त्याचा निर्णय कसा योग्य आहे हे सिद्ध करावे लागेल. तर सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग या दोन्ही स्वायत्त संस्था असल्यामुळे सुप्रीम कोर्टालाही निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्यास मर्यादा येतील.

ठाकरे गटाकडे दुसरा पर्याय आहे तो नव्या नावासाठी आणि नव्या चिन्हासाठी अर्ज करून प्रक्रिया सुरू करू शकतात. ठाकरे गटाला मिळालेले ताप्तुरते मशाल चिन्ह आणि पक्षाचे नाव आता फक्त कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव देखील ठाकरेंना पोटनिवडणुकीतपर्यंत वापरता येणार आहे. निवडणुकीच्या ऑर्डरमध्ये हे लिहण्यात आले आहे.

२६ फेब्रुवारीनंतर उद्धव ठाकरे यांना नाव वापरता येणार नाही. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा निवडणूक आयोगात जाणार आहे. आयोगाने चिन्ह आणि पक्षाचे नाव नियमित करावे, अशी मागणी ठाकरे गट करणार आहे.