Uddhav Thackrey: ठाकरेंचं टेन्शन वाढलं? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 आमदार शिंदेंच्या वाटेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackrey

Uddhav Thackrey: ठाकरेंचं टेन्शन वाढलं? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 आमदार शिंदेंच्या वाटेवर

शिवसेनेत गेल्या काही दिवसात नाराजीचे सुर दिसून येत आहेत. अशातच काही मंत्री आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच शिवसेनेचे 22 आमदार शिंदे गटाला सोडण्याच्या मनस्थितीत असून 9 खासदारही संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्याने केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटात फुट पडणार असल्याचा दावा शिवसेना (शिंदेगटाच्या) नेत्याने केला आहे.

ठाकरे गटाचे 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. शिवसेना (शिंदे गटा)चे खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. राऊत यांचा हा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी खोडून काढत ठाकरे गटाचे 12 आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

कीर्तिकर यांच्या या दाव्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

शिवसेना (शिंदे गटाचे) खासदार गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी म्हणाले कि, 'त्यांच्याकडे जे 15 आमदार आहेत, 5 खासदार आहेत त्यातील पाच पैकी तीन ते चार लोक तर नाहीच.. त्यातील दोन ते तीन लोक आहेत, त्यांची नाव घेणार नाही, पण ते अजिबात येणार नाहीत, ते मोठे लाभार्थी आहेत. 15 पैकी दोन ते तीन लाभार्थी आहेत ते आमच्या सोबत येणार नाहीत. मात्र 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असंही कीर्तिकर म्हणाले आहेत.

22 आमदार सोडण्याच्या मनस्थितीत तर 9 खासदारही संपर्कात- विनायक राऊत

शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले असून हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. 13 पैकी 9 खासदारही आमच्या संपर्कात आहेत. खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. कामं होत नाहीत, तुच्छतेची वागणूक मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:चं बुड स्थावर केलं आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार या आमदार, खासदारांनी केला असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.