पंढरपूरच्या प्राध्यापकांची कौतुकास्पद कामगिरी : कोरोनाला रोखण्यासाठी बनवले "डिस्टन्स अलर्ट डिव्हाईस'..!

Swery
Swery

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर सर्वत्र कोरोनाला थोपवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. असे प्रयत्न करत असतानाच नागरिकांमध्ये मात्र सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे चित्र दिसून येते. केवळ सुरक्षित अंतर न ठेवल्याच्या कारणामुळे अनेकजण एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोनाला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकांनी एक नवीन यंत्राची निर्मिती केली आहे. 

या यंत्रामुळे समोरील व्यक्तीपासून आपण सुरक्षित अंतर ठेवू शकतो. सुरक्षित अंतराच्या मर्यादेमध्ये आल्यास या यंत्राचे लाल लाईट प्रकाशमान होऊन एक प्रकारे सावध राहण्याची सूचना करते. या यंत्रामुळे व्यक्ती मर्यादेच्या आत येत नाहीत आणि सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत होते. समोरील व्यक्तीस मर्यादित अंतरावर ठेवण्यासाठी या यंत्राला डिस्टन्स सेटिंग करता येते. हे यंत्र जर प्रत्येकाकडे असेल तर त्यावरील बझरचा आवाज ऐकून समोरचा नागरिक काही ठराविक अंतर दूर राहून संभाषण करू शकतो आणि साहजिकच कोरोना महामारीपासून बचाव करू शकतो. 

हे यंत्र स्वेरीचे संस्थापक - सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे प्रा. आशिष जाधव, प्रा. रेश्‍मा देशमुख व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रा. अविनाश पारखे यांनी बनवले आहे. या यंत्राचे नाव "डिस्टन्स अलर्ट डिव्हाईस' असे असून, याचे मॅन्युफॅक्‍चरिंग कॉस्ट साडेसातशे रुपये आहे. याचा आकार लहान असल्यामुळे ते आपण सहज खिशामध्ये ठेवू शकतो. या यंत्रामध्ये वापर केलेल्या "अल्ट्रासोनिक सेन्सर एचसी-एसआर04'च्या साहाय्याने आपले व समोरील व्यक्ती यामधील अंतर मोजण्यात येते. या अंतराचा डिजिटल डेटा मायक्रो कंट्रोलरच्या साहाय्याने व्हेरिफाय केला जातो. जर हे अंतर एक मीटरपेक्षा कमी असेल तर त्यामध्ये असलेला स्वयंचलित मायक्रो कंट्रोलर हा अलर्ट बझर आणि त्याचबरोबर एलईडी इंडिकेशन देतो, ज्यामुळे हे यंत्र ज्या व्यक्तीने धारण केले आहे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून दूर राहण्यासाठी एक प्रकारे सूचना मिळते. 

या डिव्हाईसचे उत्पादन पूर्णतः स्वेरीमध्ये करण्यात आले असून स्वेरीतील थ्रीडी प्रिंटिंग फॅसिलिटी, लेझर कटिंग मशिन्स आणि आणि मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंग लॅबचा उपयोग या डिस्टन्स अलर्ट डिव्हाईसच्या निर्मितीमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी देखील स्वेरीने अनेक शोध लावले असून आता त्यात या यंत्राची भर पडली आहे. सध्याच्या काळात या यंत्राची खूप आवश्‍यकता आहे असे दिसून येते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com