राज्यात 5.32 कोटी क्विंटल साखर उत्पादन ! टेंभुर्णीच्या विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सर्वाधिक गाळप

भारत नागणे 
Thursday, 21 January 2021

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे राज्यात सर्वाधिक 10 लाख 33 हजार 216 टन ऊस गाळप आणि 9 लाख 54 हजार 500 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तर कोल्हापूरच्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याने साखर उताऱ्यात उच्चांकी आघाडी घेतली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना महामारीसह अतिवृष्टी आणि महापूर या अस्मानी संकटांवर मात करत राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामाला आता चांगलीच गती आली आहे. 18 जानेवारी अखेरीस राज्यातील 182 साखर कारखान्यांनी 5 कोटी 46 लाख 10 हजार टन उसाचे गाळप करून 5 कोटी 32 लाख 74 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे राज्यात सर्वाधिक 10 लाख 33 हजार 216 टन ऊस गाळप आणि 9 लाख 54 हजार 500 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तर कोल्हापूरच्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याने साखर उताऱ्यात उच्चांकी आघाडी घेतली आहे. 

मागील दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यावर्षी राज्यातील बंद असलेले अनेक साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात राज्यात विक्रमी साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. 

राज्यातील 8 साखर विभागातील 182 साखर कारखाने सुरू आहेत. या साखर कारखान्यांनी 18 जानेवारी अखरेपर्यंत जवळपास साडेपाच कोटी टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यातून 5 कोटी 32 लाख 74 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात वाढ झाली असली तरी साखर उताऱ्यात मात्र घट झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सरासरी 12.25 टक्के साखर उतारा मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल सातारा येथील सह्याद्री साखर कारखान्याने सरासरी 12.12. टक्के इतका साखर उतारा मिळवला आहे. 

यंदाच्या हंगामात नांदेड विभागाने 9.34 टक्के साखर उतारा मिळवत सोलापूर आणि नगर विभागाला मागे टाकले आहे. दरवर्षीच्या तुलनेत सोलापूर विभागाचा तब्बल एक ते दीड टक्‍क्‍याने साखर उतारा कमी आहे. सोलापूर आणि नगर विभागात सरासरी 8.94 टक्के इतका साखर उतारा आहे. तुलनेत पुणे विभागाचा (10.01) एक टक्‍क्‍याने साखर उतारा अधिक आहे. 

आतापर्यंत राज्यात कोल्हापूर विभागातील 37 कारखान्यांनी 1 कोटी 27 लाख टन उसाचे गाळप करून 1 कोटी 45 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. त्याखालोखाल सोलापूर विभागातील 40 साखर कारखान्यांनी 1 कोटी 21 लाख 51 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 8 लाख 68 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सर्वांत कमी नागपूर विभागात 1 लाख 83 हजार टन उसाचे गाळप झाले असून 1 लाख 54 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 

राज्यात 18 जानेवारी अखेरीस 182 साखर कारखान्यांनी 5 कोटी 46 लाख 10 हजार टन उसाचे गाळप करून 5 कोटी 32 लाख 74 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात कोल्हापूर विभागात सर्वाधिक तर नागपूर विभागात कमी गाळप झाले आहे. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे सर्वाधिक गाळप झाले आहे. तर साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. 
- पांडुरंग साठे, 
साखर सहसंचालक, सोलापूर विभाग 

  • विभाग    कारखाने   गाळप (लाखात)  साखर (क्विंटल)    उतारा 
  • कोल्हापूर   37         127.99                145.24               11.35 
  • पुणे           30         119.27                120.44                10.1 
  • सोलापूर     40         121.51                108.68                 8.94 
  • नगर          25           80.34                  71.08                8.94 
  • औरंगाबाद  21           45.88                  39.38                8.58 
  • नांदेड         24           45.18                  42.20                9.34 
  • अमरावती      2            4.10                    3.46                8.44 
  • नागपूर          3            1.83                    1.54                8.42 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthalrao Shinde Sugar Factory has the highest sugarcane crushing in the state