मोठी बातमी..! राज्यातील 'एवढ्या' गावांमध्ये पाणी टंचाई; 'या' जिल्ह्यांमध्ये एकही टॅंकर नाही 

तात्या लांडगे
बुधवार, 3 जून 2020

राज्यातील 887 गावे अन्‌ अठराशे वाड्यांना टॅंकरमधून पाणी 


राज्यातील 887 गावांसह एक हजार 719 वाड्यांवरील नागरिकांना 813 टॅंकरच्या माध्यमातून पाणी पोहच केले जात आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत 25 मेपासून 85 टॅंकर वाढले आहेत. मागील वर्षी टॅंकरची संख्या 20 हजारांहून अधिक झाली होती. यावर्षी मात्र, एवढी टंचाई जाणवली नसून सिंधुदूर्ग, धुळे, जळगाव, कोल्हापूर, हिंगोली, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यंदाही एकाही टॅंकरची गरज भासलेली नाही. सद्यस्थितीत राज्यात शासकीय 139 तर खासगी 677 टॅंकर पाणी पुरवठा करीत आहेत. 

सोलापूर : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातील पाणी टॅंकरच्या संख्येत 90 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे घागरी घेऊन एक-दोन किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे टंचाईग्रस्त 887 गावे आणि एक हजार 719 वाड्या-वस्त्यांवरील नागरिक हवालदिल झाले आहेत. परंतु, दुसरीकडे आनंददायी बाब म्हणजे राज्यातील सिंधुदूर्ग, धुळे, जळगाव, कोल्हापूर, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही टॅंकर लागलेला नाही. 

राज्यात सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 144 गावे आणि 29 वाड्यांवर 138 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील बीड जिल्ह्यातील 66 गावे आणि 47 वाड्यांवर 122 टॅंकर सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील 106 गावे आणि 476 वाड्यांवर 111 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी व नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक तर लातूर, वाशिम व अकोला या जिल्ह्यात प्रत्येकी दोन पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर सुरू आहेत. 

ठळक बाबी... 

  • राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये अवघे आठ टॅंकर: सिंधुदूर्ग, धुळे, जळगाव, कोल्हापूर, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली यंदा झाले टॅंकरमुक्त 
  • मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 90 टक्‍क्‍यांनी टॅंकर घटले; सरकारची 400 कोटींहून अधिक बचत 
  • राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सुरु आहेत 805 टॅंकर; तीन लाखांहून अधिक नागरिकांना होतोय पाणी पुरवठा 
  • नांदेड जिल्ह्यातील पाच गावे व 15 वाड्यांसाठी 16 टॅंकर, उस्मानाबादमधील 14 गावांसाठी 16 टॅंकर, अमरावतीतील 20 गावांसाठी 22 टॅंकर, ठाण्यातील 67 गावे आणि 196 वाड्यांसाठी 44 टॅंकर, रायगड जिल्ह्यातील 111 गावे आणि 330 वाड्या-वस्त्यासाठी 45 टॅंकर तर रत्नागिरीतील 76 गावे व 151 वस्त्यांसाठी 18 टॅंकर, पालघरमधील 36 गावे आणि 114 वस्त्यांसाठी 40 टॅंकर, नाशिकसाठी 45 टॅंकर सुरु असून शंभरहून अधिक तर साताऱ्यात 23, पुण्यात 45, सांगलीमध्ये आठ तर औरंगाबाद जिल्ह्यात 138, जालन्यात 43, बुलढाण्यात 11, यवतमाळमध्ये 16 आणि नागपूरमध्ये 19 टॅंकरद्वारे तेथील नागरिकांना होतोय पाणी पुरवठा 
  • सोलापुरातील बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ व सांगोल्यात प्रत्येकी एक तर माढ्यात सहा आणि करमाळ्यात तीन टॅंकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity in'so many villages in the state There are no tankers in 10 districts