esakal | आपल्याला 'लॉकडाउन' आणि 'नॉकडाउनही' नको; मुख्यमंत्र्यांचं उद्योगांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray

आपल्याला 'लॉकडाउन' आणि 'नॉकडाउनही' नको; मुख्यमंत्र्यांचं उद्योगांना आवाहन

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : आपल्याला लॉकडाउन आणि नॉकडाउनही नको, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योग जगताला केलं आहे. यासाठी कोरोनाच्या सर्व नियमावलींची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बैठकीदरम्यान ते बोलत होते. (we dont want lockdown and nockdown CM Udhav Thackeray appeal to industries)

हेही वाचा: अजित पवारांनी आमदारांची यादी चोरणं कोणती नैतिकता? - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत ज्या पद्धतीनं कोरोना साथीची परिस्थिती हाताळली गेली त्याची जगात प्रशंसा होत आहे. अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. राज्य शासनानं दीड वर्षात कोरोना परिस्थितीला हाताळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्याचदरम्यान कोरोना विषाणूचे स्वरूप बदलल्याने अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरु करावेत, कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असं उदाहरण मला देशात निर्माण करायचं आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असं आवाहनही यावेळी उद्धव ठाकरेंनी उद्योग जगताला केलं.

लॉकडाउन आणि नॉकडाउन

अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत त्यामुळे काळजी घ्यावी. एकदम काहीही शिथिल केलेलं नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक करायचे याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेतील. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असं आपल्याला वागावं लागेल. युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, नाहीतर कोरोनाने आपल्याला नॉकडाउन केलं असतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचं गांभीर्य आधोरेखित केलं.

हेही वाचा: "शिवरायांचं नौदल धोरण देशाला आजही दिशादर्शक"

आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आणि कामगारांचे लसीकरण करून घेणं, पाळ्यांमध्ये काम करणं, घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्रोत्साहन देणं या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या शिवाय ज्या लोकांना कामावर येणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना दिली.

छोट्या व मध्यम उद्योजकांना सुविधा देणार - उद्योगमंत्री

कोरोनामुळं लॉकडाउन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी लघू व मध्यम उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुविधा देण्यात येतील, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. मोठे उद्योग समूह आपल्या कामगारांसाठी उपहारगृहाची सोय देऊ शकतात. मात्र, छोट्या उद्योजकांकडे कामासाठी येणारे १५-२० हमाल आणि इतर कामगार येतात अशांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५३ उपहारगृह चालविण्यात येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणीसाठी शासनातर्फे जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल असंही देसाई यांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top