अजून काही दिवस मान्सून सतावणार; प्रतिक्षा संपेनाच!

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे.
maharashtra monsoon Update
maharashtra monsoon Updategoogle
Updated on
Summary

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे.

पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. मात्र केरळात वेळेआधी दाखल झाल्यानंतर वेगाने गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारणाऱ्या मान्सूनची वाटचाल थांबलेली आहे. महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

यंदा नियमित सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ मे) देवभूमी केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर दोनच दिवसांत ३१ मे मान्सूनने संपूर्ण केरळ राज्य व्यापून कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. कारवार, चिकमंगळूर, बंगळूर, धर्मापुरीपर्यंतच्या भागात मान्सूनने वाटचाल केली आहे. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मान्सूनने वाटचाल केलेली नाही. वाटचालीस पोषक हवामान नसल्याने महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणार आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता. ७) मान्सूनच्या बंगालच्या उपसागरावरील शाखेने पुढे चाल केली आहे. पद्दुच्चेरी, कराईकलसह तमिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सूनने प्रगती केली आहे. ईशान्य भारतातील राज्ये, सिक्कीम तसेच पश्‍चिम बंगालच्या हिमालयाकडील भागातील मान्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सूनचे आगमन फार लांबलेले नाही

कोकणात साधारणत: ५ जूननंतर मान्सून दाखल होतो. त्यानंतर हळूहळू तो महाराष्ट्राच्या विविध भागांत दाखल होत असतो. यंदा केरळ आणि कर्नाटकात मान्सून लवकर आल्याने महाराष्ट्रातही त्याचे लवकर आगमन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात होती. मान्सूनची प्रगती थांबल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मान्सूनचे आगमन खूप लांबलेले नसून, अद्यापही आपण नियमित वेळेच्या जवळच आहोत. शिवाय राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरूच आहे. मान्सूनच्या आगमनाविषयी हवामान विभागाकडून माहिती देण्यात येईल.

- डॉ. कृष्णानंद होसाळीकर, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे

आज वादळी पावसाची शक्यता

मान्सूनचे आगमन लांबले असले तरी राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उद्या (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून, उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

वादळी पावसाचा इशारा

  • कोकण - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

  • मध्य महाराष्ट्र - नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

  • मराठवाडा - औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

पुण्यासह राज्यात उकाडा वाढला

पुणे - पुण्यासह राज्यात उकाडा वाढला असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. राज्यात सर्वाधिक तापमान गोंदिया येथे ४५.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३४.४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुणे शहरासह राज्यातील इतर भागांत उन्हाचा चटका कायम आहे. त्यासोबतच अंशतः ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये शहर आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com