
Shivsena : सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणूक आयोगाच्या उलटा लागला तर? घटनातज्ञ सांगतात...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून त्याचबरोबर घटनातज्ञ यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान घटनातज्ञ उल्हास बापट यांनी या संबधी प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या आधी द्यायला नको होता. निवडणूक आयोगाकडे मॅच्युरिटी असणं आवश्यक होतं. आयोगाच्या या निर्णयाचे राजकीय परिणाम होऊ शकतात.
सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा हेच निवडणूक आयोगाला कळायला पाहिजे होतं. या सगळ्याचा गांभीर्याने विचार सर्व राजकीय पक्षांनी केला पाहिजे. आज हे सत्तेवर आहेत उद्या दुसरे सत्तेवर असतील तेव्हा तात्पुरता विचार न करता भारतीय लोकशाही सुदृढ कशी होईल कशा रीतीने लोकशाही व्यवस्थित रितीने चालेल याचा विचार आपण करायला पाहिजे. हा एक राजकीय भूकंप असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.
पुढे घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले की, त्याचे किती परिणाम होतात आणि किती त्याच्यामध्ये येतात हे आपल्याला काळच ठरवेल. आता चार-सहा दिवसात कदाचित सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू शकतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर का आत्ताच्या इलेक्शन कमिशनच्या उलटा लागला तर मग सगळी गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तेव्हा निवडणूक आयोगाने हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधी वेळेमध्ये गंभीर चूक केलेली आहे असं माझं मत आहे असं बापट बोलताना म्हणाले आहेत.
काही लोक दबावाला बळी पडू शकतात. सगळेच दबावाला बळी पडतात असं नाही. पण काही विकत घेतली जाणारी लोक असतात तेव्हा आपण घटनेचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. उद्धव ठाकरेंकडे फार मोठी टीम आहे. कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी सारखे वकील आहेत. त्यांना दिलेल्या निर्णय विरोधात सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.