अधिक मास म्हणजे नेमकं काय; तो कसा मोजला जातो? जाणून घ्या...

टीम ई सकाळ 
Friday, 25 September 2020

कालगणनेच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे सौरवर्ष आणि दुसरे चांद्रवर्ष. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. हे भ्रमण पूर्ण होण्याचा काळ म्हणजे एक वर्ष असे गणित 'सौर' वर्षाचे असते,

नागपूर - नुकताच पितृपक्ष संपून अधिक मास सुरू झालाय. या काळात अनेकजण धार्मिकतेकडे झुकलेले पाहायला मिळतात. अनेकजण व्रतवैकल्य करताना दिसतात. याला काही ठिकाणी 'धोंडा मास'ही म्हणतात. पण, याला 'अधिक' किंवा 'धोंडा' मास, अशी नावे का पडली? याबाबत जाणून घेऊया.

कालगणनेच्या दोन पद्धती -

कालगणनेच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे सौरवर्ष आणि दुसरे चांद्रवर्ष. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. हे भ्रमण पूर्ण होण्याचा काळ म्हणजे एक वर्ष असे गणित 'सौर' वर्षाचे असते, तर चांद्रमास आणि चांद्रवर्षाची गणना चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या काळावर अवलंबून असते.

अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क
 

शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे चैत्र, वैशाख हे भारतीय महिने चंद्राच्या गतीप्रमाणे व नक्षत्रांवरून मोजले जातात. त्यांना चांद्रमास म्हणतात. सूर्याची व चंद्राची दृक्प्रत्ययी गती थोडी वेगळी असते. चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा २८ दिवसांत पूर्ण करतो. अर्थात त्यानुसार सौर वर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे १२ महिन्यांचे ३६५ दिवस न भरता ते ३५५ भरतात. 

प्रत्येक महिन्यात अशी तूट येत असल्यामुळे आपल्या चांद्रमासाच्या वर्षाचे दिवस व सौर वर्षाचे दिवस यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारणत: दर तीन वर्षांनी म्हणजेच सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी (२२ महिने १६ दिवस ४ घटिकांनी) एक चांद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच  'अधिक मास' म्हणतात. ज्या वर्षी हा अधिक मास येतो, ते चांद्रवर्ष १३ महिन्यांचे असते.

दरवर्षी ११ दिवस, एक तास, ३१ मिनिटे आणि १२ सेकंदाचा फरक पडत असतो. आता तीन वर्षांनी एकदा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पंचांगात 'अधिक' मासाची गणना करण्यात येते, असे पंचागकर्ते सांगतात.

पुरुषोत्तम मास -

ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी आपली पंचांगे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. एका चांद्रवर्षात ३६० तिथी होतात. एका सौरवर्षात ३७१ तिथी होतात. त्यामुळे दरवर्षी ११ तिथी वाढत जाऊन त्या ३३ झाल्या की अधिकमास येतो. भारतात अधिकमासाचे ज्ञान इ. सणांपूर्वी पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे वेदकालातही होते. ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास धरला जातो. अधिक महिन्याला पुरुषोत्तममास असेही म्हणतात, असे प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात.

आजारातून बरे झाल्यानंतर जाणवतोय अशक्तपणा? मग हे उपाय करा आणि अशक्तपणा कायमचा घालवा
 

...म्हणून 'धोंडा' मास म्हणातात -

अधिक मासात सूर्यसंक्रांत नसते. सूर्यसंक्रांत म्हणजे या काळात सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करत नाही. त्यामुळे या महिन्याला 'मल मास' असेही म्हणतात. काही मंगल कार्ये या काळात केली जात नाहीत. त्यामुळेच या महिन्याला धोंडा मास असेही म्हणतात.

संपादन - भाग्यश्री राऊत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is mean by adhik maas in hindu calender