अतिरिक्त कामातून शिक्षकांची कधी होणार सुटका? शाळाबाह्य मुलांसह निरक्षरांचा सर्व्हे, मतदार नोंदणीची जबाबदारी शिक्षकांवरच

खासगी इंग्रजी शाळांशी स्पर्धा करून शाळेतील मुलांची पटसंख्या टिकावी-वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असतानाच शिक्षकांना शाळाबाह्य मुलांसह आता निरक्षरांचा सर्व्हे आणि दरवर्षी मतदार नोंदणी आणि निवडणूक ड्यूटी, अशा जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत आहेत.
शिक्षक
शिक्षकGoogle

सोलापूर : खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करून आपल्या शाळेतील मुलांची पटसंख्या टिकावी व वाढावी, यासाठी गुणवत्तेसाठी प्रयत्न सुरू असतानाच शिक्षकांना शाळाबाह्य मुलांसह आता निरक्षरांचा सर्व्हे आणि दरवर्षी मतदार नोंदणी आणि निवडणूक ड्यूटी, अशा जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत आहेत. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, पण भविष्यातील पिढी गुणवत्तापूर्ण घडविणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त बोजा नको, असा सूर निघू लागला आहे.

दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर गौरविले जाते. आपली मुले क्रीडा स्पर्धेत, शिष्यवृत्ती परीक्षेत, इतर इंग्रजी माध्यमांमधील मुलांच्या तुलनेत अधिक दर्जेदार व्हावीत, यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेचा प्रयत्न असतो. मात्र, २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ आणि सध्याची स्थिती खूपच बदलली आहे.

एकेकाळी शारीरिक शिक्षण व मूल्यशिक्षण हे विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचे, तसे शिक्षकही विद्यार्थ्यांकडून विविध खेळांची तयारी करून घ्यायचे. त्यातूनच देशाला अनेक खेळाडू मिळाले. सध्या मात्र ते विषय केवळ नावालाच असल्याची स्थिती आहे. शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाल्यास ते दिवस पुन्हा येतील, पण अतिरिक्त कामामुळे अनेकांना ते शक्य होत नसल्याचीही ओरड आहे. स्पर्धेच्या काळात शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर कामांची जबाबदारी देणे कितपत योग्य, याचा विचार करण्याची वेळ आल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

अध्यापनाबरोबर महिनाभर मतदार नोंदणीची जबाबदारी

दरवर्षी सर्वत्र मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली जाते. त्यासाठी बीएलओ म्हणून शिक्षकांची नेमणूक केली जाते. २१ जुलै ते २१ ऑगस्ट या काळात यंदा ही मोहीम पार पडली. पण, काहींनी काम वेळेत केले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. अध्यापनाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडणाऱ्या शिक्षकांवर असे गुन्हे दाखल होणे चर्चेचा विषय बनला. अध्यापनाशिवाय इतर कामातून सुटका व्हावी म्हणून अनेकदा शिक्षक संघटनांकडून निवेदने देण्यात आली, पण अजून त्यावर निर्णय झालेला नाही.

‘बीएलओं’ना मतदान केंद्रावर नसते ड्यूटी

बीएलओ म्हणून मतदार नोंदणीचे काम करणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीवेळी मतदान (बूथ) केंद्रावर ड्यूटी दिली जात नाही. दरवर्षी महिनाभर विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाते. त्यावेळी नियुक्त शिक्षकांनी ते काम करणे अपेक्षित आहे. १७ ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी आणि ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. त्याअनुषंगाने ही जबाबदारी दिली जाते, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com