esakal | पिवळ्या लाईनच्या बाहेर आहात, मग टोल भरू नका !
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्‍यांवर 'फास्टटॅग'ची अंमलबजावणी या पद्धतीने होत आहे. मात्र, त्यापासून राज्य रस्ते विकास महामंडळ अद्याप दूर आहे.

पिवळ्या लाईनच्या बाहेर आहात, मग टोल भरू नका !

sakal_logo
By
मंगेश कोळपकर सकाळ वृत्तसेवा

पुणे : टोल प्लाझापासून १०० मीटर आत पिवळी रेष आखणे राज्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाने (एनएचएआय) आता बंधनकारक केले आहे. त्यामुळे काही कारणास्तव 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून 100 मीटरच्या आत रांग येईपर्यंत वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल, असेही एनएचएआयने स्पष्ट केले आहे.

टोल प्लाझावर वाहने सुरळीत व जलदगतीने जाण्यासाठी, ‘एनएचएआय’ने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर गर्दीच्या वेळीही प्रति वाहन 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार टोल प्लाझावर वाहतूक अखंडपणे सुरळीत ठेवण्यासाठी वाहने 100 मीटरपेक्षा जास्त रांगेत राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. बहुतांश टोल प्लाझावर फास्टॅग १०० टक्के अनिवार्य केल्यामुळे वाहनचालकांचा प्रतिक्षा कालावधी कमी झाला आहे. तरीही काही कारणास्तव 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून 100 मीटरच्या आत रांग येईपर्यंत वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. या उद्देशाने टोल बूथपासून 100 मीटर अंतरावर पिवळ्या रेषा प्रत्येक टोल मार्गिकेत चिन्हांकित केल्या जातील. टोल प्लाझा चालकांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आता सुधारणा करावी लागणार आहे.

हेही वाचा: पुणे : एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र; संख्या झाली दुप्पट

2021 फेब्रुवारीच्या मध्यापासून एनएचएआय यशस्वीरित्या 100% कॅशलेस टोलिंगमध्ये परिवर्तित झाले आहे, एनएचएआय टोल प्लाझा येथे एकूणच फास्टॅग प्रवेश 96% पर्यंत पोहोचला आहे आणि बऱ्याच टोल प्लाझांवर 99% आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाचा (ईटीसी) वाढता वापर लक्षात घेता टोलवसुलीची कार्यक्षम व्यवस्था करण्यासाठी पुढील 10 वर्षांसाठी वाहतुकीच्या अंदाजानुसार नवीन डिझाइन बनवून आगामी टोल प्लाझा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे, असे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.

सुरक्षित अंतर नियम, ही नवी जीवनशैली झाल्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी फास्टॅग वापराचा पर्याय निवडत आहेत. कारण यामुळे वाहनचालक आणि टोल चालक यांच्यात थेट संपर्क होण्याची शक्यता दूर होते. महामार्गांवरील वापरकर्त्यांद्वारे फास्टॅगचा वापर आणि त्यातील सातत्यपूर्ण वाढ उत्साहवर्धक असून टोल वसुलीत अधिक कार्यक्षमता आणण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आता फास्टॅगचा वापर आणखी प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षाही ‘एनएचएआय’ने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: खासगी बसने येणाऱ्यांचे आता होणार स्क्रिनींग