esakal | पुणे : एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र; संख्या झाली दुप्पट
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

पुणे : एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र; संख्या झाली दुप्पट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर माननीयांनी ताबा घेतल्यावरून राजकारण सुरू झालेले असताना आता महापालिका प्रशासनाने प्रत्येक नगरसेवका मागे एक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात महापालिकेचे सध्या ९१ केंद्र सुरू होती. आता ही संख्या दुप्पट होऊन १८१ केंद्र निश्‍चीत करण्यात आली आहेत.

केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला लस पुरवठा अपुरा होत असताना नगरसेवकांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची स्पर्धा लागली आहे. यात काही सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव टाकून केंद्र सुरू करून घेतले. अनेकांना केंद्र न मिळाल्याने वाद सुरू झाले. तसेच लसीकरण केंद्र नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेऊन वशिला असेल त्यांनाच लस देण्यास सुरवात केली. तसेच स्वतःचे फ्लेक्सही लावले होते. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रारही केली होती. त्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी लसीकरण केंद्रांवर राजकीय तावडीतून सोडविण्यासाठी आदेश काढत शासकीय कामात अडथळा आणला तर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला होता.

हेही वाचा: दिलासादायक! पुणे शहरात दहा दिवसांत चार हजार खाटा झाल्या रिकाम्या

या आदेशानंतर सत्ताधारी, विरोधीपक्ष एकत्र येऊन आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत घेऊन प्रत्येक नगरसेवकाला एक केंद्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांकडून नगरसेवकाचे नाव आणि त्यांनी सुचविलेले लसीकरण केंद्र याची आरोग्य विभागाला सादर करण्यात आली. आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी आयुक्तांच्या तोंडी आदेशानुसार लसीकरण केंद्र व नगरसेवकांचे नाव याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवकांनाही लसीकरण केंद्र देण्यात आले आहेत. यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा: पुणे शहरात आज होणार ६९ केंद्रांवर लसीकरण

अशी आहे स्थिती

  • - पुणे महापालिकेची यापूर्वी शहरात १०० लसीकरण केंद्र होती

  • - त्यापैकी ९१ चालू तर ९ बंद

  • - ९१ मध्ये काही नगरसेवकांनी सुचविलेले केंद्र

  • - आता ८३ नगरसेवकांकडून नवे प्रस्ताव

  • - त्यानुसार जुने ९१, नवे ८३ केंद्र व प्रशासकीय सोईसाठी ७ अशी एकूण १८१ केंद्र

  • - एकूण नगरेसवकांची संख्या १६२ असली तरी त्यापेक्षा १९ केंद्र जास्त

  • - नगरसेवकांच्या सोईसाठी खासगी शाळेतही केंद्र

हेही वाचा: पुण्यात पीएमपीच्या बसमधून सुरु होणार कुरिअर आणि मालवाहतुक

अजून ५४ लाख डोस लागणार

लस पुरवठा अपुरा असतानाही १८१ लसीकरण केंद्र एकाच दिवशी सुरू ठेवणे महापालिकेसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे एक दिवसाआड एक केंद्र सुरू ठेवण्याच्या विचारात प्रशासन आहे. पुण्यात कमीतकमी ३२ लाख नागरिकांचे लसीकरण अपेक्षीत असून, त्यासाठी किमान ६४ लाख डोस आवश्‍यक आहेत. बुधवारपर्यंत शहरात ९ लाख ८३ हजार डोस दिले आहेत. आणखी ५४ लाखापेक्षा जास्त डोसची आवश्‍यकता आहे. लस मिळावी म्हणून महापालिकेचा खटाटोप सुरू असला तरी प्रत्यक्षात मुबलक लस मिळेपर्यंत लसीकरणाची वाटचाल खडतरच आहे.

''लसीकरण केंद्र कमी आणि लसीची मागणी जास्त असल्याने प्रत्येक वादविवाद होत होते. हे टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागात चार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी जागा सुचविली आहे. हे नागरिकांच्या सोईसाठी वाढविले असून, नगरसेवकांसाठी नाही.''

- मुरलीधर मोहोळ, महापौर