आत्मकथनाच्या वाटेवर दोन सितारे..! (नाममुद्रा)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

चित्रपटांच्या रंगीबेरंगी दुनियेतल्या सिताऱ्यांबद्दल सामान्य लोकांमध्ये अपरंपार कुतूहल असते. ह्या कुतूहलापोटी आजमितीस आपल्या देशात शेकडो फिल्मी गॉसिप मासिके, नियतकालिके हातोहात खपत असतात. दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर ही चविष्ट मेजवानी दररोज प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. समाजमाध्यमांमध्ये ह्या खमंग चर्वितचर्वणाचे ढिगारे पडलेले असतातच. बॉलिवूडमधल्या खऱ्या-खोट्या भानगडींपासून चित्रपटांच्या गल्ल्याच्या आकडेवारीपर्यंत सारे काही सदान्‌कदा इतके कानावर पडत असते, की टाळू म्हटले तरी ते टाळता येत नाही.

चित्रपटांच्या रंगीबेरंगी दुनियेतल्या सिताऱ्यांबद्दल सामान्य लोकांमध्ये अपरंपार कुतूहल असते. ह्या कुतूहलापोटी आजमितीस आपल्या देशात शेकडो फिल्मी गॉसिप मासिके, नियतकालिके हातोहात खपत असतात. दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर ही चविष्ट मेजवानी दररोज प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. समाजमाध्यमांमध्ये ह्या खमंग चर्वितचर्वणाचे ढिगारे पडलेले असतातच. बॉलिवूडमधल्या खऱ्या-खोट्या भानगडींपासून चित्रपटांच्या गल्ल्याच्या आकडेवारीपर्यंत सारे काही सदान्‌कदा इतके कानावर पडत असते, की टाळू म्हटले तरी ते टाळता येत नाही. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि एकेकाळचा चॉकलेट हीरो ऋषी कपूर ह्या दोघांनी ह्याच जानेवारी महिन्यात आपापली आत्मकथने वाचकांसमोर पेश करण्याचे ठरवले आहे, ही बातमी सध्या जोर धरू लागली आहे. अर्थात हे काही निव्वळ गॉसिप नाही, करण जोहर आणि ऋषी कपूर ह्यांनी आपल्या आत्मचरित्रांची शीर्षके आणि ट्रेलरसारखा थोडासा मजकूरही वानगीसाठी प्रसिद्ध केला आहे. ऋषी कपूरच्या आत्मचरित्राचे नाव "खुल्लम खुल्ला', तर करण जोहरच्या आत्मनिवेदनाचे नाव आहे "अनसूटेबल बॉय'. 

"माझ्या निवेदनात मी सारे काही खुल्लम खुल्ला सांगून टाकणार आहे' असे ऋषी कपूर ह्यांनी मागे एकदा ट्विट केले होते. त्यातला मसालेदार भाग काही ठिकाणी यथायोग्य पद्धतीने "लीक' होईल अशी व्यवस्थाही केली गेली. करण जोहर त्याचे आत्मचरित्र 25 मे रोजी त्याच्या वाढदिवशी आणणार होता. पण अचानक निर्णय बदलून ते जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच बाजारात येत असल्याचे त्याने जयपूरमधील एका वाङ्‌मय महोत्सवात जाहीर करून टाकले. ""मी काय कर्तृत्व गाजवले आहे, त्यापेक्षा माझा लैंगिक दृष्टिकोन काय आहे, ह्यात लोकांना जास्त रस असावा. मी समलिंगी आहे की नाही, हे साऱ्या जगाला एव्हाना ठाऊक झालं आहे, तरीही! पण तसे थेट विधान मी एवढ्यासाठीच करणार नाही, कारण तसे मी केले तर ह्या देशात मी तुरुंगात जाऊ शकतो.

माझं चरित्र वाचल्यानंतर तरी ह्या चघळगप्पांना आळा बसेल, अशी आशा आहे...'' असे करण जोहरने काहीशा कडवटपणाने जाहीर केले आहे. करण जोहर हा समंजस आणि प्रगल्भ जाणिवांसाठी ओळखला जातो. त्याच्या पुस्तकाने या विशिष्ट प्रश्‍नाबद्दल लोकांचा दृष्टिकोन अधिक निकोप झाला, तरी पुरे. ह्या दोघांच्या चरित्रांमुळे आपली चित्रपटसृष्टी गॉसिपच्या उथळ चर्चांच्या पलीकडे जाण्याची शक्‍यताही बरीच सुखद वाटते, हेही खरेच. 

 

Web Title: Two stars on the way to the autobiography (Nammudra)