थेट तुमच्या गाडीतच शिरणार 70 एमएम पडदा!

संतोष भिंगार्डे
शनिवार, 14 जानेवारी 2017

आपल्याच गाडीतून सिनेमाचा आस्वाद घेण्याची आठवण काही मुंबईकर कदाचित सांगू शकत असतील; पण मधल्या काळात ड्राईव्ह इन थिएटर बंद झाल्याने तो मार्ग बंद झाला होता; पण पुन्हा एकवार ते थिएटर सुरू होतेय, त्यामुळे चित्रपटाचा थेट गाडीतूनच आनंद घेण्याचा मार्ग मोकळा होतो आहे.

आपल्याच गाडीतून सिनेमाचा आस्वाद घेण्याची आठवण काही मुंबईकर कदाचित सांगू शकत असतील; पण मधल्या काळात ड्राईव्ह इन थिएटर बंद झाल्याने तो मार्ग बंद झाला होता; पण पुन्हा एकवार ते थिएटर सुरू होतेय, त्यामुळे चित्रपटाचा थेट गाडीतूनच आनंद घेण्याचा मार्ग मोकळा होतो आहे.

तुमच्याकडे गाडी आहे... तुम्हाला "दंगल', "रईस' किंवा "काबील' यांसारख्या बिग बजेट आणि बिग स्टार्स असलेल्या चित्रपटांचा मनमुराद आनंद मोठ्या स्क्रीनवर आणि तोही गाडीतून न उतरता घ्यायचा आहे? तथास्तू... तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मॉलमध्ये जायचं तर गाडी पार्क करण्यासाठी त्या अनेक वळणावळणाच्या रस्त्याने जाणं, पार्किंगसाठी योग्य जागा शोधणं. धावतपळत आपली सीट गाठणं आणि सिनेमा संपल्यानंतर पुन्हा त्या मल्टिलेव्हल पार्किंगमधून आपली गाडी शोधून काढणं ही एक कसरतच असते; पण आता गाडीतून न उतरताच, फक्त आपल्याच माणसांच्या सहवासात मोठ्या स्क्रीनवर सिनेमा पाहायचा असेल तर ते सहज शक्‍य होणार आहे.

ड्राईव्ह इन थिएटर परदेशात चांगलीच लोकप्रिय ठरली होती; पण वांद्रे येथे सुरू झालेले ड्राईव्ह ईन काळाच्या जरा आधीच सुरू झाले असावे. त्याही काळात ते लोकप्रिय ठरले होते; पण साऱ्याच मध्यमवर्गीय घरात गाडी आली नव्हती तेव्हा. आज मात्र या गाड्यांमुळेच थिएटर "हाऊसफुल्ल' होऊ शकेल.

खरे तर सन 1970 मध्ये हे थिएटर सुरू झाले. तेव्हा यामध्ये जवळपास 800 गाड्या राहतील आणि गाडीतच बसून चित्रपट पाहता येईल अशी व्यवस्था होती. केवळ हिंदीच नाही तर अन्य भाषेतील चित्रपट तिथे बघता येत होते. सायंकाळी सातचा पहिला शो आणि नंतर रात्री दहाचा दुसरा शो असे दोनच शो होत होते. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारचे ओपन थिएटर महाराष्ट्रात पहिलेच होते. भारतात फक्त चेन्नई आणि अहमदाबाद येथे अशी ओपन थिएटर आहेत.
हे थिएटर जेव्हा सुरू झाले तेव्हा मुंबईत मल्टिप्लेक्‍सची साखळी नव्हती. जी होती ती सारी सिंगल स्क्रीनच होती. मुंबईत जवळपास तेव्हा शंभर ते सव्वाशे सिंगल स्क्रीन थिएटर होती. ओपन थिएटर ही संकल्पना तेव्हा तशी अगदीच नवीन होती. भव्य अशा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची गंमत काहीशी न्यारीच होती. आठवड्याला जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न या थिएटरमधून मिळत होते. तेव्हा वांद्रे पूर्व येथे कलामंदिर हे एकच सिंगल स्क्रीन थिएटर होते. (आताही ते थिएटर कायम असले तरी त्याचे नाव बदलण्यात आलेय.) त्यामुळे ओपन थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. गाडी पार्क करायची अन्‌ स्पीकर गाडीत ठेवून चित्रपट पाहायचा ही गंमत न्यारी होती. त्या वेळी सगळ्यांनी या ओपन थिएटरचे स्वागत केले; मात्र काही कारणास्तव सन 2003 मध्ये हे थिएटर बंद झाले आणि सगळी ती गंमतच निघून गेली.

आता या परिसरात अनेक मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. कॉर्पोरेटस्‌ची इथे गर्दी होतेय. मोठमोठी ऑफिसेस येथे झालेली आहेत. सळसळती आणि उत्साही तरुण मंडळी येथे काम करतात. त्यांच्यासाठी आता हे ड्राईव्ह इन थिएटर पुन्हा नव्या ढंगात उभे राहतेय. त्याचे काम सुरू झालेले आहे. या नव्या थिएटरची रचना अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. आता येथे अडीचशे ते तीनशे गाड्या पार्क करून चित्रपट पाहता येणार आहे. तसेच आतमध्ये एक मॉल आणि एक चांगले हॉटेल उभारण्यात येणार आहे. तरुण पिढीसाठी हा एक वेगळा अनुभव असणार आहे. कारण खात-पीत मोकळ्या किंवा आपल्याच गाडीच्या आपल्याला हव्या त्या तापमानात, एसीमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे आता इथे फोर डी साऊंड सिस्टिम्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच वर्षी हे थिएटर रसिकांसाठी सुरू होईल.

सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्‍झिबीटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांच्याकडेही यासंदर्भातल्या आठवणी आहेत. त्या जागवताना ते म्हणाले, ""मी या थिएटरमध्ये चित्रपट पाहिलेले आहेत. ती गंमत वेगळीच होती. इथला पडदा, वेगळी साऊंड सिस्टिम आणि आपल्याच गाडीतून हवे तसे रेलून, अगदी झोपूनही आपला आवडता चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यातली मौजच वेगळी. हे थिएटर पुन्हा सुरू होतेय याचा आनंद आहे. आजच्या पिढीला हा एक वेगळा अनुभव घेता येईल. लवकरच मनोरंजन क्षेत्रात हा नवा धमाका होईल!''

Web Title: 70 mm Car comes directly to your screen!