‘कान्स’ मध्ये दिसला ‘माधवन इफेक्ट' Cannes Film Festival 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

75th Cannes International Film Festival Actor R Madhavan Rocketry The Nambi Effect movie
‘कान’मध्ये दिसला ‘माधवन इफेक्ट’

‘कान्स’ मध्ये दिसला ‘माधवन इफेक्ट'

कान्स (फ्रान्स) : फ्रान्समध्ये मंगळवारपासून (ता.१७) सुरू झालेल्या ७५ व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक भारतीय कलाकार सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे अभिनेता आर. माधवन यांचा ‘रॉकेटरी ः द नंबी इफेक्ट’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या प्रिमियरचे आयोजन स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री नऊ वाजता केले होते. त्यापूर्वी झालेल्या चर्चासत्रात माधवन याने भारताकडे सांगण्यासाठी काही विलक्षण कथा असल्याचा उल्लेख केला.

तो म्हणाला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करता आर्यभट ते गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई अशा अनेक कथा भारताकडे आहे. ते संपूर्ण जगातील तरुणाईचे आदर्श आहेत. अभिनेत्यांपेक्षा या व्यक्तिमत्त्वांचे चाहते जास्त आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका करणारा आर. माधवन हा ‘रॉकेटरी ः द नंबी इफेक्ट’द्वारे प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचे ‘कान’मधील प्रदर्शन हा त्याच्यासाठी आणि देशासाठीही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. ‘रॉकेटरी’ हा विज्ञान कथेवर आधारित चित्रपट आहे. माधवनला या विषयात रस असल्याने त्याच्या पहिल्या चित्रपटाचे कथानकही विज्ञानाशी संबंधित आहे. आपल्याकडील गुणवत्तेला प्रयोगांची जोड देत त्याने भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंते नंबी नारायणन यांची जीवनकथा पडद्यावर साकारली आहे.

माधवन याच्या चित्रपट दिग्दर्शनाच्या निर्णयाचे चाहत्यांनी मनापासून स्वागत केले होते व त्याच्या क्षमतेवर विश्‍वास व्यक्त केला होता. त्याच्या ‘रॉकेटरी’बद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनीही कौतुक केले आहे. त्यामुळेच प्रिमियरसाठी विविध देशांमधील नामवंत, चित्रपट रसिक आवर्जून उपस्थित होते. कान महोत्सवाच्या उद्घाटन काळ्या रंगाचा सूट, काळे बूट आणि काळा गॉगल घालून रेड कार्पेटवर आर.माधवनने याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते

बॉलिवूडचे आकर्षण

अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या कान महोत्सवात यंदा प्रथम भारताला पहिला ‘सन्मानीय देशा’चा दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्याच्या उद्‍घाटनाला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह दीपिका पदुकोण, ऐश्‍वर्या राय-बच्चन, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया आदी अभिनेत्री तसेच ज्येष्ठ अभिनेता कमल हसन, आर. माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, संगीतकार ए.आर. रेहमान, दिग्दर्शक शेखर कपूर आदी दिग्गजांनी हजेरी लावली. दीपिका पदुकोण या महोत्सवात ज्युरी आहे.