esakal | ..तेव्हा एका बार गर्लने माझे आभार मानले- अतुल कुलकर्णी
sakal

बोलून बातमी शोधा

 atul kulkarni news of retirement

"..तेव्हा एका बार गर्लने माझे आभार मानले"; अतुल कुलकर्णीने सांगितला किस्सा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

२००१ साली प्रदर्शित झालेल्या 'चांदनी बार' Chandni Bar या चित्रपटासाठी अभिनेता अतुल कुलकर्णीला Atul Kulkarni सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अतुलच्या करिअरमधील हा दुसराच चित्रपट होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुलने या चित्रपटाबद्दलच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत. "माझ्या करिअरमधील तो सर्वांत महत्त्वाचा अनुभव होता. २००० साली प्रदर्शित झालेल्या 'हे राम' या चित्रपटासाठीसुद्धा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण चांदनी बारमुळे मला एक वेगळी ओळख मिळाली", असं तो म्हणाला.

अभिनेत्री तब्बूसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, "माझ्यासाठी आणि तब्बूसाठी हा खूप वेगळ्या विषयाचा चित्रपट होता. चित्रपटातील भूमिकेसाठी आम्हाला एकमेकांसोबत अत्यंत मैत्रीपूर्ण राहायचं होतं. जेव्हा एखादा स्टार नव्या कलाकारासोबत काम करतो, तेव्हा त्या नव्या कलाकारासोबत मैत्रीपूर्ण नातं निर्माण करण्याची मोठी जबाबदारी त्या स्टारवर असते. तब्बूने हे काम खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं."

चांदनी बार या चित्रपटाला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीत एक उदाहरण प्रस्थापित करून सिनेमा समजण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणल्याचं मत अतुलने यावेळी मांडलं. "हा त्या चित्रपटांपैकी एक आहे ज्याने नवं पर्व सुरू केलं आणि ते केवळ अनोख्या कथेमुळेच नाही तर ज्यापद्धतीने लोकांनी ती कथा स्वीकारली त्याबाबतीतही. क्लासिक पद्धतीने शोकांतिका मांडली होती. त्यात कोणतंही मूळ गाणं नव्हतं. हा एक असा चित्रपट होता, जो त्या काळी गैर-व्यावसायिक मानला गेला असता. पण तो एक सुपरहिट चित्रपट ठरला," असं त्याने पुढे सांगितलं.

हेही वाचा: 'निर्लज्ज आंटी' म्हणणाऱ्या ट्रोलरला जिनिलियाचं सडेतोड उत्तर, पहा व्हिडीओ

या चित्रपटात पोट्ट्या सावंत या गुंडाच्या व्यक्तिरेखेसाठी अतुल कुलकर्णीची प्रेक्षक-समीक्षकांनी पाठ थोपटली होती. चित्रपटामुळे घटलेली एक घटना आजही लक्षात असल्याचं त्याने मुलाखतीत सांगितलं. अतुल म्हणाला, "चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक ट्रायल शो होता. खऱ्या आयुष्यातील बार गर्ल्ससाठी हा शो आयोजित केला होता. शो संपल्यानंतर मी थिएटरच्या बाहेर उभा होतो, तेव्हा एक बार गर्ल माझ्याजवळ आली. तिने माझा हात हातात घेऊन आभार मानले. तुम्ही बार गर्लशी लग्न केलं, यासाठी तुमचे आभार, असं ती मला म्हणाली."

चांदनी बार या चित्रपटाचं दिग्दर्शन मधुर भंडारकरने केलं होतं. या चित्रपटाने चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते.

loading image
go to top