
'झुंड सिनेमात तू मला आवडला नाहीस'; आकाशला आमिरनं दिली कामाची पोचपावती
नागराज मंजुळे(Nagraj Manjule) दिग्दर्शित बहुचर्चित 'झुंड'(Jhund) 4 मार्च रोजी अखेर प्रदर्शित झाला. 'झुंड' हा सिनेमा स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे.अमिताभ बच्चन सारखा स्टार,सिनेमाचं तगडं कथानक आणि आकाश ठोसर सोबतच इतरही तगडे कलाकार अशा सर्वच गोष्टी सिनेमाचे यूएसपी मानले जात होते. आज बॉक्स ऑफिसवरनं भले जरी या सिनेमाचं नशीब 'हीट,फ्लॉप' अशा तराजूत मापलं जाणार असलं तरी मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून समिक्षकांनी मात्र सिनेमाला कधीच एका चांगल्या कलाकृतीचा दर्जा देऊन टाकला आहे. विजय बारसे ही व्यक्तिरेखा या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. हा स्पोर्ट्स ड्रामा असला तरी खेळाचं प्रशिक्षण या भोवतीच हा सिनेमा फिरत नाही तर त्या अनुषंगानं येणाऱ्या व्यवस्थेवर देखील परखड भाष्य करतो,नव्हे ताशेरेच ओढतो.
नागराज आणि टीमनं परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan) साठी 'झुंड' सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. तेव्हा 'झुंड' या सिनेमाला पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसून आली आहे. ''नागराजच्या सिनेमानं आमच्या ३०-३५ वर्षाच्या अनुभवाला फुटबॉलसाऱखं भिरकावून दिलंय'', असं आमिर म्हणाला आहे.
तर त्याचवेळी सिनेमात काम करणाऱ्या आकाशा ठोसरचं अभिनंदन करताना आमिर म्हणाला,''एकतर नागराजनं तुला ही भूमिका का दिली?. माझं तुझ्यावर प्रेम आहे. एक अभिनेता म्हणून तू मला आवडतोस. पण या सिनेमात तू ज्या पद्धतीनं वाईट वागलायस ते मला पडद्यावर पाहणं आवडलं नाही''. अर्थात ही आमिर कडून आकाशला मिळालेली पोचपावतीच म्हणावी लागेल. आकाशनं आमिरच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनीही यासाठी त्याच कोडकौतूक केलं आहे.