'तू ऐश्वर्याच्या लायकीचा नाहीस' म्हणणाऱ्याला अभिषेक बच्चनचं सडेतोड उत्तर

abhishek aishwarya
abhishek aishwarya

सोशल मीडियावरील ट्रोलिंगचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या ट्रोलिंगला वैतागून काही कलाकारांनी थेट सोशल मीडियालाच रामराम केला. तर काहीजण ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद करतात. असंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी 'द बिग बुल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या ट्रेलरची चर्चा असतानाच एका नेटकऱ्याने अभिषेकला त्याच्या खासगी आयुष्यावरून ट्रोल केलं. संबंधित ट्रोलरलाही अभिषेकने सडेतोड उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं.

अभिषेकला सोशल मीडियावर जेव्हा जेव्हा ट्रोल केलं गेलं, तेव्हा तेव्हा त्याने ट्रोलर्सना बेधडकपणे उत्तर दिलं. अनेकदा त्याच्या कारकिर्दीवर, अभिनयावर, चित्रपटांवर प्रश्न उपस्थित केले गेले. एकीकडे सोशल मीडियावर 'द बिग बुल' या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरची चर्चा होत असताना दुसरीकडे नेटकऱ्याने त्याला त्याच्या कर्तृत्वावरून सुनावलं. 'तू कोणत्याच कामासाठी योग्य नाहीस. तुझ्याकडे फक्त सुंदर पत्नी आहे आणि याच कारणामुळे मला तुझी ईर्षा होते. पण तू तिच्याही लायकीचा नाहीस', असं ट्विट त्या ट्रोलरने केलं. 

अभिषेकचं सडेतोड उत्तर
अभिषेकने संबंधित ट्रोलरला टॅग करत लिहिलं, 'ओके. सल्ल्यासाठी तुझे आभार. फक्त मला एक गोष्ट समजली नाही की तू हे कोणाला उद्देशून म्हणालास. कारण या पोस्टमध्ये तू अनेकांना टॅग केलं आहेस. इलियाना आणि निकिता यांचं तर लग्न झालेलं नाही. त्यामुळे अजय, मी आणि कूकीच राहिलो. तर डिस्ने प्लस हॉटस्टार विवाहित आहे की नाही याची चौकशी करून तुम्हाला कळवतो.'

अभिषेकचं हे उत्तर वाचून अनेकांना हसू अनावर झालं. काहींनी त्याच्या या हजरजबाबीपणाचं कौतुकही केलं. इतकंच नव्हे तर अभिषेकच्या खासगी आयुष्यावरून टिप्पणी करणाऱ्या ट्रोलरलाही नेटकऱ्यांनी सुनावलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com