अपघातानेच अभिनेत्री झाले... 

चिन्मयी खरे 
बुधवार, 18 जानेवारी 2017

नम्रता गायकवाड ही मराठमोळी मुलगी एका साऊथ इंडियन चित्रपटात काम करते आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत... 

 तू करियरची सुरुवात कशी केलीस? 
- मी लहान असताना कधी विचार नव्हता केला की, मी अभिनय क्षेत्रात काम करेन. अपघातानेच मला नाटकात काम करायची संधी मिळाली. "ज्ञानोबा माझा' हे माझं पहिलं नाटक. तेव्हा मी काम करत असताना विविध ठिकाणी ऑडिशन्स देत होते. तेव्हा "मंगळसूत्र' या मालिकेसाठी माझं सिलेक्‍शन झालं. मालिकेत काम केल्यानंतर मला अभिनय करण्याचा कॉन्फिडन्स आला. टेक्‍निकल अभिनयही मी शिकले. म्हणजे कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करायचा, या गोष्टीचं ज्ञान मला मिळालं. त्यानंतर मी आणखी ऑडिशन्स देत गेले. त्यामध्ये माझं "स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटासाठी सिलेक्‍शन झालं. हा माझा पहिलाच चित्रपट होता आणि त्यात मी राजेश शृंगारपुरे यांच्याबरोबर काम करत होते. पहिल्यांदा खूप दडपण आलं होतं. पण त्यानंतर मी अनेक चित्रपटात कामं केली. "विजय' या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांच्याबरोबर मी काम केलं होतं. त्यात मी एका कन्नड मुलीची भूमिका केली होती. "लंगर' चित्रपटात मी मुरळीची भूमिका केली. त्यानंतर "वंशवेल' या चित्रपटात मी काम केलं. या चित्रपटात मला बाईक चालवता येत असल्यामुळे काम करायची संधी मिळाली. त्यानंतर "कॅम्पस कट्टा' नावाचा चित्रपट केला. त्यानंतर आता साऊथ इंडियन चित्रपटात काम करते आहे. 

साऊथ इंडियन चित्रपटात काम करण्यासाठी तू तेथील भाषा कशी शिकलीस? 
- मी त्या भाषेचा प्राथमिक अभ्यास केला होता. काही तेथील मल्याळम चित्रपट पाहिले होते. तेथील चित्रपटसृष्टीत कोण-कोण फेमस आहेत, त्यांची माहिती काढली होती. कारण आपण तिथे काम करायला जाणार आणि आपल्याला काहीच माहिती नाही, असे होऊ नये. माझी एक मल्याळम मैत्रीण होती. तिच्याशी बऱ्याच वेळा बोलायचे. तिच्याकडून काही शब्द जाणून घेतले. एक मल्याळम गाणं पाठ केलं. पण तिथे जाऊन मी गांगरलेच होते. चित्रपटाची स्क्रिप्ट ही मल्याळममध्ये होती. तेव्हा वाचता यायचं नाही, त्यामुळे जे असिस्टंट डायरेक्‍टर होते ते मला स्टोरी इंग्लिशमधून सांगायचे आणि मी ती मराठीत लिहून घ्यायचे. अशा प्रकारे मी स्क्रिप्ट वाचायचे. तेथील लोकांशी मल्याळममध्ये जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न मी केला. एवढे प्रयत्न करून त्यांना माझं काम आवडलं, याचं मला खूप समाधान आहे. आणि आता मी साऊथमध्येही काम करू शकते, हा एक आत्मविश्‍वास आला आहे. 

साऊथमध्ये काम करायची संधी कशी मिळाळी? 
- "विजय असो' या चित्रपटात मी कन्नड मुलीची भूमिका साकारली होती आणि त्या चित्रपटातील गेटअपमध्ये माझे फोटो होते फेसबुकवर. ते फोटो बघून मला प्रॉडक्‍शन हाऊसने कॉन्टॅक्‍ट केला होता. मग मी त्यांना आणखी काही फोटो पाठवले. त्यांना ते आवडले आणि त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात घेण्याचं निश्‍चित केलं. 

या तुझ्या चित्रपटाबद्दल काय सांगशील? 
- या चित्रपटाचे नाव "आयाल जीवीचिरीपुंड' म्हणजेच (अस्तित्वात आहे) असं आहे. या चित्रपटात मी विजयबाबू या मल्याळम चित्रपटसृष्टीतील एका स्टारबरोबर काम करतेय. त्यांच्या पत्नीची भूमिका मी केली आहे. ही पत्नी एक यशस्वी बिझनेस वूमन आहे आणि पती लेखक आहे. एक प्रॅक्‍टिकल विचार करणारी मुलगी आणि एक संवेदनशील माणूस यांच्या नात्यामध्ये कोणते प्रॉब्लेम्स्‌‌‌ येतात आणि त्यातून कसा मार्ग काढता येतो. हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजकालच्या स्थितीशी जवळीक साधणारी ही कथा आहे. 

तू भरतनाट्यम शिकली आहेस. त्यामध्ये तुला करियर करावे वाटले नाही का? 
- मी कार्यक्रम किंवा इव्हेंटस्‌मध्ये परफॉर्म करताना भरतनाट्यमच शक्‍यतो सादर करते. मी वेस्टर्न डान्सही शिकले आहे. पण क्‍लासिकल डान्स करायला मला मजा येते. खरं तर माझ्या घरी अशी कधीच कलाक्षेत्रात काम करण्याची वगैरे बॅकग्राऊंड नव्हती. मी आधी सांगितल्याप्रमाणे अपघातानेच या क्षेत्रात आले. त्यामुळे मला गाईड करणारे असे कोणी नव्हते. त्यामुळे मी कधी पुढे जाऊन अभिनेत्री किंवा डान्सर, कोरिओग्राफर बनेन, असं कधीच वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना; आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो तसा माझ्या आयुष्यात आला आणि मी अभिनेत्री झाले. आणि आज या क्षेत्रात काम करताना खूप समाधानी आणि खूप बरं वाटत आहे. सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळत आहे आणि तुमच्या आवडीचं काम करायला मिळणं यालाही नशीब लागतं. 
 

Web Title: accident and Actress ...