esakal | 'कुछ तो गडबड है दया'; शिवाजी साटम यांनी सांगितला डायलॉगमागचा भन्नाट किस्सा

बोलून बातमी शोधा

Shivaji Satam
'कुछ तो गडबड है दया'; शिवाजी साटम यांनी सांगितला डायलॉगमागचा भन्नाट किस्सा
sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनय क्षेत्रातील आपल्या करिअरमध्ये शिवाजी साटम यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र 'सीआयडी' ही त्यांची मालिका छोट्या पडद्यावर दीर्घकाळ चालली आणि या मालिकेमुळे त्यांना एक वेगळीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत शिवाजी यांनी एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारली आणि त्यांच्या तोंडी असलेला 'कुछ तो गडबड है दया' हा संवाद चांगलाच गाजला. हा डायलॉग म्हटलं की आजही त्यांचा चेहरा पटकन डोळ्यांसमोर येतोय. यावरून सोशल मीडियावर असंख्य मीम्ससुद्धा तयार झाले. पण हा डायलॉग नेमका सुचला कसा, हे तुम्हाला माहित आहे का? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द शिवाजी साटम यांनीच डायलॉगमागचा भन्नाट किस्सा सांगितला.

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "मी दिग्दर्शकांसोबत एका सीनबद्दल बोलत होतो आणि ते माझ्याकडे टक लावून पाहत होते. मी विचारलं, "काय झालं?" त्यावर ते म्हणाले, "तू आता ज्या पद्धतीने मला समजावून सांगत होता, तशाच हातांच्या हालचाली तू एसीपी प्रद्युमनच्या भूमिकेसाठी पडद्यावर करशील का?" त्यांच्या बोलण्यावरून कुछ तो गडबड है दया या संवादावर मी तसे हावभाव केले आणि नंतर तोच सीन प्रचंड गाजला."

हेही वाचा : सेलिब्रिटींच्या 'मालदिव व्हेकेशन'वर शोभा डे संतापल्या

सोशल मीडियावर जेव्हा ते मालिकेविषयी मीम्स पाहतात, तेव्हा त्यांनासुद्धा फार हसू येतं. एसीपी प्रद्युमन यांचा फोटो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जागी ठेवण्यात आलेल्याचा फोटो त्यांचा प्रचंड आवडल्याचं सांगितलं. "लिबर्टी ऑफ स्टॅच्यूच्या जागी कोणी माझ्या भूमिकेचा विचार करू शकतो, हे विचार करूनच मला हसू येतंय. तो मीम मला फारच आवडला होता आणि मीम्सच्या माध्यमातूनही मला प्रेक्षकांकडून प्रेमच मिळतंय", असं ते म्हणाले.