
धर्मेंद्र रुग्णालयातून घरी परतले; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "मी धडा..."
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्यांना घरी सोडण्यात आलं असून आपली तब्येत ठीक असल्याचं त्यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. त्याचबरोबर रुग्णालयातल्या या काळात त्यांना धडा मिळाला असल्याचंही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
स्नायूंच्या दुखण्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र सध्या ८६ वर्षांचे आहेत. रुग्णालयातून घरी परतताच धर्मेंद्र यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र म्हणतात, कोणतीही गोष्ट अती करू नका. तुमच्या मर्यादा ओळखा. मी अती केलं आणि मला धडाही मिळाला. मला स्नायूंच्या मोठ्या दुखण्याला सामोरं जावं लागलं. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. तो कठीण काळ होता. ठीक आहे, मी आता तुमच्या शुभेच्छांमुळे परत आलोय. त्यामुळे काळजी करू नका. मी स्वतःची काळजी घेईन. लव यू!
हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांचे चाहते आणि मित्र परिवाराने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. धर्मेंद्र लवकरच करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये ते रणवीर सिंग, आलिया भट, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत दिसतील. १० फेब्रुवारी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Web Title: Actor Dharmendra Discharged From Breach Candy Mumbai Shared A Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..