पेठेतच रुजला अभिनयाचा संस्कार..!

पेठेतच रुजला अभिनयाचा संस्कार..!

खंडोबा तालीम परिसरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पेठेतल्या संस्कारातच जडणघडण झाली. स्वतःतील कलाकार खऱ्या अर्थानं जागा झाला तो इथेच आणि मग सुरू झाला रंगमंचावरचा प्रवास. भास्कर जाधव दिग्दर्शित ‘नटसम्राट’, ‘गुंता’ अशी नाटकं केली आणि वीस वर्षापूर्वी याच क्षेत्रात करियर करायचं म्हणून मुंबई गाठली. आजवर अठराहून अधिक मराठी चित्रपट, बाराहून अधिक दूरचित्रवाणी मालिका आणि दोन हिंदी मालिकांतून अभिनयाची संधी मिळाली आणि त्या प्रत्येक संधीचं सोनं केलं...अभिनेता महादेव साळोखे संवाद साधत असतात आणि त्यांचा एकूणच प्रवास उलगडत जातो. 

वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर ‘मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌ इन ड्रामा’ प्रथम श्रेणीत श्री. साळोखे उत्तीर्ण झाले. मुंबईत या झगमगत्या दुनियेत पाय घट्ट रोवून उभे राहणे, वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही. मात्र, संयम जागा ठेवत मिळेल ते काम करत त्यांचा पुढचा प्रवास सुरू राहिला. रवी जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘मी सिंधुताई सपकाळ’, महेश कोठारे दिग्दर्शित ’खबरदार’ आणि ’जबरदस्त’, गिरीष मोहिते दिग्दर्शित ‘सर्वनाम’, आत्माराम धरने दिग्दर्शित ‘चल धर पकड’, आणि ‘गोविंदा’, विजय शिंदे दिग्दर्शित ‘मायक्का देवीच्या नावानं चांगभलं’ विजू माने दिग्दर्शित आणि महेश मांजरेकर प्रॉडक्‍शनचा ‘शिकारी’ आदी चित्रपटात भूमिका केल्या. ‘क्राईम डायरी’, ‘लक्ष्य’, ‘देवयानी’, ‘कृपासिंधु’, ‘ब्रह्मांडनायक’, ‘वृंदावन’, ‘आम्ही कारभारी’, ‘अशी ही धर्मकन्या’, ‘तुझ्यात जीव रंगला’ आदी मराठी मालिका तर ‘पुरब और पश्‍चिम’, ‘कालचक्र’ आदी हिंदी मालिका केल्या.

श्री. साळोखे सांगतात, ‘‘ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सारे कलाकार, तंत्रज्ञ एकत्र येवून काही उपक्रम राबवतो आहे. येत्या नऊ जूनला व्ही. शांताराम दुसरा कोल्हापूर राष्ट्रीय लघुपट महोत्सव कोल्हापुरात भरणार असून त्यात सहभागासाठी राज्यभरातून प्रतिसाद मिळतो आहे.’’

हे क्षेत्र तसे संघर्षाचे. बहुतांश जणांना संघर्ष वाट्याला येतोच. किंबहुना तो असतो म्हणूनच आणखी नवे बळ येते आणि पुढची आव्हानं पेलण्याची ताकद मिळत राहते.
- महादेव साळोखे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com