'सलूनमध्ये जाणं पडलं महागात ; लंडनचे पोलिस भडकले'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

प्रियंका ही मधु चोप्रा यांच्याबरोबर सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या बरोबर सेलिब्रेटी स्टायलिश जोश वुड बरोबर होता.

मुंबई - सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राचा उल्लेख करावा लागेल. आता ती बॉलीवूडपेक्षा हॉलीवूडमध्ये जास्त रमलेली दिसते आहे. तिकडच्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तिचा वावर अधिक आहे. असे असले तरी तिच्या भारतीय फॅन्सच्या संख्येमध्ये घट झालेली नाही. सध्या कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी प्रियंकाला लंडनच्या पोलिसांनी तंबी दिली आहे.

ब्रिटनमध्ये राहणा-या प्रियंकानं बुधवारी तेथील एका सलूनमध्ये जायचं ठरवलं. त्यानुसार ती गेलीही. मात्र तिचं ते जाणं लंडनच्या पोलिसांना खटकलं आहे. त्यांनी तिला दोषी ठरवले आहे. अशाप्रकारची कृती करुन तिनं सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याची चर्चा तेथील सोशल मीडियावर सुरु झाली आहे. याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी तिला तंबी दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिला पोलिसांनी तोंडी समज दिली आहे. आणि तिला कोरोनाच्या प्रोटोकॉलविषयी माहितीही समजावून सांगितली आहे.

ब्रिटिश डेली मेलनं प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार प्रियंका ही मधु चोप्रा यांच्याबरोबर सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या बरोबर सेलिब्रेटी स्टायलिश जोश वुड बरोबर होता. ज्यावेळी पोलिसांना ती सलूनमध्ये पोहचल्याची कुणकुण लागली त्यावेळी त्यांनी तातडीनं संबंधित सलूनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून कुठलाही दंड न घेता तिला समज देऊन सोडून दिले. सध्या ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. सगळीकडे परिस्थिती बिकट आहे. फेब्रुवारीपर्यत हा लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे. अशावेळी तेथील बीच सलून आणि स्पा यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. दुकानमालकांना दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“मिस्टर बीन यापुढे दिसणार नाही”; रोवन एटकिन्सन झाले भावनाशील

प्रियंकानं अशावेळी त्या सलूनमध्ये जाणं, आणि त्या सलून मालकानं दुकान सुरु करणे दोन्ही गोष्टी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणारे होते. कोरोनाची पुन्हा नवी लाट आल्यानं लंडन प्रशासनानं पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतात येण्यासही नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना प्रियंका सलूनमध्ये आल्याची माहिती बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मिळाली होती.  प्रियंका सध्या तिच्या पती निक जोनास याच्यासह लंडनमध्ये राहत आहे. वास्तविक ती तिच्या आगामी Text For You या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लंडनमध्ये आल्याची चर्चा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress priyanka chopra alerted by london police due to break the covid rules by went salon