esakal | रोहिणी हट्टंगडींनी सांगितली दिलीप कुमार यांच्यासोबतची खास आठवण
sakal

बोलून बातमी शोधा

Rohini Hattangadi,Dilip Kumar

रोहिणी हट्टंगडींनी सांगितली दिलीप कुमार यांच्यासोबतची खास आठवण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यासोबतची खास आठवण सांगितली. त्या म्हणाल्या,' मी दिलीप कुमार यांच्यासोबत ‘धरम अधिकारी’ या एकाच हिंदी चित्रपटात काम केलं आहे. त्यावेळी मी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होऊ लागले होते आणि अशा वेळी दिलीप कुमारसारख्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायचं होतं. मी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारत होते. खरं तर त्यांच्यासारख्या मोठ्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव हा खूपच मोठा असतो. त्यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करताना थोडं फार टेन्शन आलं होतं. परंतु शूटिंगवेळी त्यांनी मला अजिबात टेन्शन येऊ दिलं नाही.'(Actress Rohini Hattangadi shared a special memory with Dilip Kumar)

पुढे त्यांनी सांगितले, ‘धरम अधिकारी’ हा चित्रपट एका तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. ‘तू मूळ तेलगू चित्रपट पाहिला आहेस का’, असं त्यांनी मला विचारलं होतं. मी काहीसं जोशातच, ‘नाही, मला या माझ्या भूमिकेत काही तरी वेगळं करायचं आहे,’ असं सांगितलं. माझं हे उत्तर ऐकल्यानंतर दिलीप कुमार यांनी स्मितहास्य केलं, पण ते काहीच म्हणाले नाहीत. त्यावेळेस मला त्यांच्या त्या स्मितहास्याचा अर्थ समजला नाही. पण आता एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर आता समजतं की, एखादा चित्रपट पाहिल्यावर त्याचा आपल्यावर एवढा काही प्रभाव पडत नाही. कारण ती भूमिका कशी साकारायची हे त्या त्या कलाकारावर अवलंबून असतं. अनुभवातून तुम्हाला हे शहाणपण येऊ शकतं. त्यांच्या त्या स्माईलनं त्यावेळेस मला खूप काही सांगितलं होतं. आता मागे वळून पाहताना मला ते त्यांचं स्माईल आठवतं. याआधी ‘कस्तुरीमृग’ या नाटकात डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत मी काम करत होते. हे माझं पहिलंच नाटक होतं. डॉक्टर (श्रीराम लागू) त्यावेळेस हिंदीमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यांच्यासाठी ‘कस्तुरीमृग’च्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळेस दिलीप कुमार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मी इंडस्ट्रीमध्ये अगदीच नवीन होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यावेळी काय बोलायचं हे सुचत देखील नव्हतं. दिलीप कुमार आपल्या नाटकाच्या प्रयोगाला आले एवढंच महत्वाचं होतं. त्यांना मराठी नाटकांची खूप आवड होती. ते अनेक नाटकांच्या प्रयोगाला हजेरी लावायचे. त्यांना नाट्यगीतं देखील आवडायची. त्यांनी एका कार्यक्रमात नाट्यगीतं गाऊन पण दाखवली होती. त्यामुळे त्याचं मराठीशी चांगलं नातं होतं असं मला वाटतं.'

हेही वाचा: 'त्यांच्या घरात अनुभवली हजची यात्रा झाली' धरमपाजींची प्रतिक्रिया

त्यांच्या काळात चित्रपटात डायलॉगबाजी खूप असायची. हिरो म्हटलं की मोठमोठे डायलाँग ! परंतु अशा वेळी रिअॅलिस्टिक अभिनय म्हणजे काय असतो, हे दिलीप कुमार यांनी दाखवून दिलं. त्याचं संपूर्ण लक्ष हे अभिनय करण्याकडं असायचं. हेच त्यांचं मोठं वैशिष्ट्य होतं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार हे त्रिकुट नेहमीच आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये अभिनय करायचे. त्यांच्यासारखा अॅक्टर पुन्हा या इंडस्ट्रीला मिळणं शक्य नाही.

हेही वाचा: सिनेसृष्टीतील 'कोहीनूर' निखळला; दिलीप कुमार यांच्यासोबत सेलिब्रिटींच्या आठवणी

loading image