अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितला अविस्मरणीय अनुभव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

अभिनेत्री श्रुती मराठेने आजवर मालिका, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच नाव कमावले. आता तिचा हा प्रवास असाच पुढे चालत हॉलिवूड चित्रपटांकडे वळला आहे. ‘रिमेम्बर अॅम्नेशिया’ या हॉलिवूड चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर आली, यादरम्यान तिच्यासह साधलेला खास संवाद...

‘रिमेम्बर अॅम्नेशिया’ या हॉलिवूड पटात काम करताना कसे वाटले?
खरं सांगायचं तर मी एका हॉलिवूडपटात काम करतेय असे मला जाणवलेच नाही. या चित्रपटात काम करणारे बऱ्यापैकी कलाकार हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटातील माझ्या भागाचे चित्रीकरण हे परदेशात न होता महाराष्ट्रातील काही भागांत झाल्याने आपण एखाद्या हॉलिवूड चित्रपटात काम करतोय असे बिलकूल जाणवले नाही. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या चित्रपटाच्या कथेबद्दल काय सांगाल?
या चित्रपटात दाखवलेला मुख्य कलाकार म्हणजे दिलीपराव परदेशातून भारतात एका गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी येतात. भारतात आल्यानंतर मात्र अचानक एके दिवशी त्याचा अपघात होतो, या अपघातावेळी त्याची स्मरणशक्ती जाते. ही त्यांची स्मरणशक्ती परत येते की नाही हे पाहण्यासाठी चित्रपटच पाहावा लागेल. ज्या वेळी त्याचा अपघात होतो आणि त्यावर उपचार करण्यासाठी त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात येते. तेथे मी डॉक्‍टर म्हणून काम करत असते. अशा वेळी एक रुग्ण म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून त्याची काळजी मी घेत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Some more clicks Photography @kalyaam Saree - @saree.sukh

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

या चित्रपटात काम करण्याची संधी तुम्हाला कशी मिळाली?
आनंद काळे हे या चित्रपटाचा एक मुख्य भाग आहेत. त्यांनी मला कॉल करून सांगितले, की एक हॉलिवूड चित्रपट आहे, आणि त्यात तुला काम करायला आवडेल का? आणि त्याच वेळी त्यांनी मला थोडक्‍यात या चित्रपटाची कथा सांगितली. मला ही चित्रपटाची कथा फारच आवडली आणि त्यात हा हॉलिवूड चित्रपट मात्र या चित्रपटाची पार्श्‍वभूमी ही महाराष्ट्रातच आहे, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य मला जास्त भावले. आणि त्याच वेळी मी या चित्रपटासाठी होकार कळविला.

हॉलिवूड कलाकारांसोबत काम करताना कसे वाटले?
हॉलिवूड चित्रपटादरम्यान काम करताना खूप मस्त वाटले. त्यांची चित्रीकरण करण्याची पद्धत फारच व्यावसायिक आहे आणि ती मला फार आवडली. शिवाय वेळेच्या बाबतीत त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. चित्रपटातील कलाकारांशिवाय चित्रपटात काम करणारे चालक दल म्हणजे क्रू हे परदेशातले होते. त्यांचे कामाचे नियोजन आणि वक्तशीरपणा अगदी अचूक होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. रवी गोडसे यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?
रवी कामाच्या बाबतीत फारच लक्षपूर्वक असतो. त्याच्यासोबत काम करताना मला कधी कधी फारच बरे वाटते, तर कधी कधी कंटाळा येतो. चांगले यासाठी वाटते की, त्याला हव्या असलेल्या गोष्टी तो निर्धास्तपणे आमच्यासमोर मांडतो.

या मल्टिस्टार चित्रपटाबद्दल काय सांगशील?
एखाद्या चित्रपटात प्रत्येक भूमिका व्यवस्थित लिहिली गेली असेल तर त्या मल्टिस्टारर चित्रपटात काम करताना मज्जा येते. शिवाय निरनिराळ्या कलाकारांसोबत समपातळीवर काम करताना बरेच काही नव्याने शिकायला मिळते.

मराठी ते हॉलिवूड चित्रपट या प्रवासाबद्दल काय सांगशील?
एक कलाकार म्हणून मी कधीच हा प्रवास मनातही आखला नव्हता. एक कलाकार म्हणून प्रत्येक माध्यमाने मला एक वेगळी ओळख दिली आहे आणि त्याचे समाधान कायम माझ्या चेहऱ्यावर असेल. चित्रपटांपेक्षा मालिकांनी मला खरी प्रसिद्धी दिली. मात्र एक कलाकार म्हणून मला चित्रपट म्हणा किंवा हॉलिवूड चित्रपट म्हणा कुठेही तितक्‍याच आवडीने आणि तितक्‍याच जोमाने काम करायला आवडेल.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello #adelaide #australia #holiday

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Shruti Marathe interview

टॅग्स