
एका मराठी मुलाने काश्मीरमध्ये उभं केलं अनाथाश्रम.. अधिक कदमची यशोगाथा..
kon honar crorepati : ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ असलेला 'कोण होणार करोडपती' हा करोडपती दिवसेंदिवस अधिक रंगत आहे. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘कर्मवीर विशेष भागात' कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत. काश्मिरी मुलींसाठी 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातले कर्मवीर आहेत. या भागात ते काश्मीरचे जगणे उलगडणार आहेत. (adhik kadam participate in kon honar crorepati karmveer vishesh episode in sony marathi)
हेही वाचा: एकनाथ शिंदेंवर कंगना झाली भलतीच खुश.. म्हणाली, रिक्षावाला ते..
अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतात. कुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो, असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आहे. १८ दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना १९ वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात कथन केले आहेत.
'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागात अधिक कदम सहभागी होणार आहेत. अहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात 'अधिक भैय्या' म्हणून प्रसिद्ध आहेत. 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. कारण जम्मू-काश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने १६७ मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेत तर सध्या २३० मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हे सगळे अनुभव 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून ऐकता येणार आहेत. शनिवार, 2 जुलै रोजी हा भाग प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Adhik Kadam Participate In Kon Honar Crorepati Karmveer Vishesh Episode In Sony Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..