esakal | 'डॉक्टरांना चोर म्हणणाऱ्या सुनिल पालला अटक करा', गृहमंत्र्यांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

Sunil Pal
'डॉक्टरांना चोर म्हणणाऱ्या सुनिल पालला अटक करा', गृहमंत्र्यांकडे मागणी
sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनिल पाल याला वैद्यकीय कर्मचाऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणं चांगलंच महागात पडलं आहे. सुनिलने त्याच्या व्हिडीओत डॉक्टरांना चोर म्हटलं होतं. डॉक्टर्स कोव्हिड रुग्णांना लुटत आहेत, कोरोनावरील उपचारांबाबत मोठ्या प्रमाणावर गोंधळ केला जात आहे, असं वक्तव्य सुनिलने त्याच्या व्हिडीओत केलं होतं. या व्हिडीओमुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. आता सुनिलविरोधात कारवाई करण्याची आणि त्याला अटक करण्याची मागणी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आली आहे. 'एम्स'च्या निवासी डॉक्टर्स असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांबद्दल सुनिलने वादग्रस्त वक्तव्य केलं. सुनिलच्या अशा वक्तव्यांमुले सामान्य लोकांचा, रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वासाला तडा जाईल आणि हे अत्यंत वाईट आहे, असं डॉक्टरांनी त्यांच्या पत्रात लिहिलं. 'कोरोना काळात सर्वच वैद्यकीय कर्मचारी स्वत:चे प्राण धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांची ते दिवसरात्र सेवा करत आहेत. अशातच एका सेलिब्रिटीने डॉक्टरांबद्दल, वैद्यकीय कर्मचाऱ्यांबद्दल असं विधान करणं अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार आहे', असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत या वक्तव्याबाबत सुनिलवर कारवाई करण्याचीही मागणी असोसिएशनने केली आहे.

हेही वाचा : 'खरंच सुन्न व्हायला झालंय'; हेमांगी कवी परिस्थितीसमोर हतबल

सुनिल पालचं स्पष्टीकरण

"मी दररोज वृत्तवाहिन्यांवर पाहत असतो की, रुग्णांना बेडच मिळत नाहीयेत, त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत, पाच हजारांचं बिल असताना २५ हजार रुपये मागितले जात आहे. हे सगळं काम चोरच करू शकतात. ९० टक्के डॉक्टर हे चोर आहेत असं मी म्हटलं होतं. दहा टक्के डॉक्टर्स अजूनही माझ्या नजरेत चांगले आहेत. मी तर एम्सच्या डॉक्टरांचं नावसुद्धा घेतलं नव्हतं. मी काय, इतर सर्वजण त्यांच्याविषयी बोलत असतात", असं स्पष्टीकरण सुनिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलं.