

एखादा चित्रपट येतो आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून जातात. सध्या मराठी प्रेक्षक वर्गात चर्चा आहे ‘पावनखिंड’ या चित्रपटाची.
- अजय पूरकर, अंकित मोहन
एखादा चित्रपट येतो आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून जातात. सध्या मराठी प्रेक्षक वर्गात चर्चा आहे ‘पावनखिंड’ या चित्रपटाची. या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अजय पूरकर आणि अंकित मोहन यांचं खूप कौतुक होत आहे. या दोघांनी एकत्र केलेला हा तिसरा चित्रपट. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं ‘फर्जंद’ चित्रपटाच्या वेळी अंकितची अजय यांच्या ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या प्रयोगानंतर दोघांची पहिली भेट झाली.
अंकितनं सांगितलं, ‘अजय पूरकर यांचं व्यक्तिमत्त्व खूप स्ट्रॉंग आहे. ते अतिशय अनुभवी आहेत, त्यांच्यात खूप आत्मविश्वास आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच, पण त्यासोबतच ते उत्तम गायकही आहेत. गेल्या जन्मी आमचं काहीतरी नातं असेल, कारण ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या तिन्ही चित्रपटांमध्ये आम्ही साकारलेल्या व्यक्तिरेखांचा एकमेकांशी काही ना काही संबंध आहे. कामाच्या बाबतीत ते फार मेहनती आहेत. या भूमिकांसाठी त्यांनी फिटनेससोबतच शस्त्रास्त्र चालवण्याचंही प्रशिक्षण घेतलं. बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली आणि त्यांनी या भूमिकेला पूर्ण न्याय दिला. त्यांचा संगीताचा, इतिहासाचा खूप चांगला अभ्यास आहे. त्यांच्या या ज्ञानाकडं बघून मला जाणवलं, की आपल्याला इतिहासाचा आणखी अभ्यास केला पाहिजे. अजय पूरकर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं मी अमराठी आहे, असं मला कधीही जाणवू दिलं नाही. आजपर्यंत त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या शैलीच्या भूमिका साकारल्या, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत अशी की कोणत्याही भूमिकेत ते आपली छाप पाडतात. यापुढंही त्यांच्याबरोबर काम करून नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला मला नक्कीच आवडेल.’
अजय अंकितबद्दल बोलताना म्हणाले, ‘अंकित हुशार, मेहनती अभिनेता आहे. स्वतःला काय वाटतं यापेक्षा दिग्दर्शकाला काय अभिप्रेत आहे, हे समजून घेऊन तो काम करतो. मला सगळं आलंय असा त्याचा कधीही भाव नसतो. याउलट तो नवीन गोष्टी जाणून घेत असतो. ‘फर्जंद’ हा त्याचा मराठीत काम करण्याचा पहिलाच अनुभव होता. हा ऐतिहासिक चित्रपट आणि सोबतीला सगळे नावाजलेले कलाकार. तेव्हा दिग्पालनं अंकितवर घेतलेली मेहनत फार वरच्या दर्जाची आहे. त्याच्या शरीरयष्टीचं कौतुक प्रेक्षकांनी केलंच, पण त्याच्या अभिनयाचंही कौतुक झालं. मला त्यानं ‘फर्जंद’ चित्रपटात साकारलेली भूमिका अतिशय आवडली. भाषेवर तो मेहनत घेतो, अनुभवी कलाकार कसे काम करतात याचं निरीक्षण करतो आणि त्यातून अनेक गोष्टी शिकतो. प्रत्येकातले चांगले गुण तो घेतो. एक माणूस म्हणून अंकित खूप सच्चा आहे. तो मॅच्युअर आहे, तितकाच अल्लडही आहे. मराठी भाषेवर त्यानं अजून काम केल्यास अनेक उत्तमोत्तम भूमिका त्याच्या वाट्याला येतील आणि मराठी मनोरंजन सृष्टीला अंकितच्या रूपानं एक देखणा आणि अभ्यासू अभिनेता मिळेल.’
पावनखिंड चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून चित्रपटाची संपूर्ण टीम भारावून गेली आहे. ऐतिहासिक भूमिका साकारणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं, असं या दोघांनी सांगितलं. अजय म्हणाले, ‘या भूमिकेसाठी मी दुग्धजन्य पदार्थ आणि पौष्टिक आहार घेऊन वजन वाढवलं. तसंच या भूमिकेच्या लुकवर आम्ही बरीच मेहनत घेतली.’ तर अंकित म्हणाला, ‘या भूमिकेसाठी मी तिरंदाजी शिकलो आणि त्यात पारंगत झालो.’ बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेनं अजय यांना त्यागाचं महत्त्व पटवून दिलं, तर रायाजी बांगल यांच्या भूमिकेनं अंकितला आयुष्याकडं बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला आणि स्वतःचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन पुढं जाणं किती महत्त्वाचं असतं हे शिकवलं, असंही या दोघांनी आवर्जून सांगितलं.
(शब्दांकन - राजसी वैद्य)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.