रहाणेच्या अजिंक्य नावाचं फिल्मी कनेक्शन माहिती आहे का?

वृत्तसंस्था
Thursday, 28 January 2021

अजिंक्य रहाणेच्या नावाचं अजिंक्य देव यांच्या नावाशी असलेलं कनेक्शन जसं समोर आलं. तसंच काहीसं कनेक्शन अजिंक्य देव यांच्या नावाचंही आहे. त्यांच्या आजोबांच्या नावावरून त्यांना नाव देण्यात आलं.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी विजय साजरा केला. या विजयानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचं कौतुक केलं जात आहे. मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनीही रहाणेचं कौतुक करून एक खास गोष्ट शेअर केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नावाचं त्यांच्या नावाशी असलेलं कनेक्शन यामधून सांगितलं आहे.

एका मुलाखतीत रहाणेच्या वडिलांनी अजिंक्य नावामागची गोष्ट सांगितली होती. मधुकर रहाणे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ अभिनेते अजिंक्य देव यांच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर अजिंक्य देव यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि त्याबाबत कृतज्ञतासुद्धा व्यक्त केली. 

तिच्या जन्मानंतर दोन वर्षांनी आई-वडिलांनी केलं होतं लग्न; शाळेत नाव बदलून जायची

अजिंक्य देव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये  म्हटलं आहे की, अजिंक्य रहाणेच्या वडिलांचा इंटरव्ह्यू वाचला. त्यामध्ये रहाणेच्या नावाबद्दल विचारलं असता त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की, अभिनेते अजिंक्य देव यांच्या नावावरून अजिंक्य नाव ठेवलं आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असून अजिंक्य नेहमीच अजिंक्य राहील अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं आहे. 

आजोबांच्या नावावरून अजिंक्य देव नाव
अजिंक्य रहाणेच्या नावाचं अजिंक्य देव यांच्या नावाशी असलेलं कनेक्शन जसं समोर आलं. तसंच काहीसं कनेक्शन अजिंक्य देव यांच्या नावाचंही आहे. त्यांच्या आजोबांच्या नावावरून त्यांना नाव देण्यात आलं. अजिंक्य देव यांनी त्यांच्या नावाबद्दल सांगताना म्हटलं की, माझे आजोबा कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे वकील होते. त्यावेळी त्यांचा कोणत्याच खटल्यात पराभव झाला नव्हता. त्यामुळे वडिलांनी माझं नाव अजिंक्य असं ठेवलं. कधीही पराभूत होत नाही असा म्हणजे अजिंक्य असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजिंक्य देव हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे अजिंक्य देव यांचे वडिल आहेत. अजिंक्य देव यांना महाराजा यशवंतराव गौरव पुरस्कारने गौरवण्यात आले आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून अजिंक्य देव प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajinya rahane & ajinkya dev film name connection