ऑन स्क्रीन : अनडन : वास्तवाच्या स्वरूपाचा मागोवा

केट पर्डी आणि राफेल बॉब-वॅक्सबर्ग यांनी निर्माण केलेली ‘अनडन’ ही मालिका अशा कलाकृतींपैकी आहे, ज्याबाबत बोलणे काहीसे क्लिष्ट असते.
andam serial
andam serialsakal
Summary

केट पर्डी आणि राफेल बॉब-वॅक्सबर्ग यांनी निर्माण केलेली ‘अनडन’ ही मालिका अशा कलाकृतींपैकी आहे, ज्याबाबत बोलणे काहीसे क्लिष्ट असते.

केट पर्डी आणि राफेल बॉब-वॅक्सबर्ग यांनी निर्माण केलेली ‘अनडन’ ही मालिका अशा कलाकृतींपैकी आहे, ज्याबाबत बोलणे काहीसे क्लिष्ट असते. एकतर गौप्यस्फोट होण्याचा धोका संभवत असतो, शिवाय कथानकातील उपजत क्लिष्टता अशी, की मालिका समजावून कशी सांगावी, हा यक्षप्रश्नही असतो. ‘अनडन’चा मुख्य भाग हा एक स्त्री पात्र आणि त्या पात्राने कालप्रवास करत स्वतःच्या आयुष्यात बदल घडविण्याच्या केलेल्या प्रयत्नांबाबत आहे. मात्र, या एकोळी स्पष्टीकरणाला जोडून इतरही अनेक मुद्दे येतात. ज्यात पिढीजात मानसिक आजार आणि पात्राचे मानसिक स्वास्थ्य, भावनिक आघात, भूतकाळातील घटनांचे वर्तमानावर होत असलेले परिणाम असे अनेक कंगोरे आहेत.

‘अनडन’ ही मालिका रोटोस्कोपिंगच्या तंत्राचा वापर करून निर्मिलेली ॲनिमेटेड मालिका आहे. ज्यात प्रत्यक्ष चित्रिलेल्या दृश्यांचा वापर करीत संपूर्ण मालिका ॲनिमेट केली आहे. ज्याद्वारे मालिकेला एक विलक्षण व ठळकपणे वेगळी दृश्यशैली प्राप्त होते. मालिकेचा सहनिर्माणकर्ता राफेल बॉब-वॅक्सबर्ग हा ‘बोजॅक हॉर्समन’ या आणखी एका लोकप्रिय ॲनिमेटेड मालिकेचा निर्माणकर्ता आहे. शिवाय, केट पर्डीदेखील ‘बोजॅक हॉर्समन’च्या लेखकांपैकी एक.

‘अनडन’ची संकल्पना सुचली तीदेखील ‘बोजॅक हॉर्समन’चा एक एपिसोड लिहित असताना. त्यामुळे सुरुवातीला उल्लेखलेल्या यशापयश, मानसिक स्वास्थ्य, भूतकाळ व वर्तमानाचा संबंध या संकल्पनांचा विचार करता ‘बोजॅक हॉर्समन’ आणि ‘अनडन’मध्ये काही साम्यस्थळे आढळू शकतात. मात्र, या मूलभूत साम्यापलीकडे मांडणी व दृश्यशैलीच्या स्तरावर दोन्हींमध्ये कुठलेही साम्य नाही. मुळात ‘अनडन’शी तुलना करता यावी, अशी इतर कोणतीही कलाकृती नाही, इतकी ती एकमेवाद्वितीय आहे!

‘अनडन’मधील मुख्य पात्र असलेल्या अल्माचा (रोजा सॅलाझार) अपघात झाल्यानंतर तिच्या कालप्रवासाला सुरवात होते, असे मानता येते. ज्यानंतर ती वीस वर्षांपूर्वी झालेल्या तिच्या वडिलांच्या (बॉब ओडनकर्क) मृत्यूचे रहस्य उलगडू पाहते. शिवाय, तो टाळता येतो का, याच्याही शक्यता ती चाचपडत असते. मात्र, अल्मा खरोखर कालप्रवास करीत आहे, की हा सारा खेळ तिच्या मेंदूमध्ये सुरू असून प्रत्यक्षात काहीच घडत नाही, याविषयीच्या संदिग्धतेचा कंगोरा मालिकेमध्ये अस्तित्वात आहे. हा परिणाम जितका संकल्पनेच्या स्तरावरील आहे, तितकाच इथल्या दृश्य मांडणीमुळे साधला जाणारा आहे. ज्यामुळे वास्तवाच्या गूढ स्वरूपासोबतच स्किझोफ्रेनियासारख्या आजारात निर्माण होणाऱ्या दुभंगलेल्या ओळखीचेही (आयडेन्टिटी) समर्पक चित्र समोर उभे राहते.

मालिका ज्या संकल्पनांना स्पर्श करते त्यात काळ या संकल्पनेचे स्वरूप, मानसिक आरोग्य आणि पिढीजात समस्या, आई-वडिलांमधील नातेसंबंधांचा मुलांच्या वैयक्तिक जीवनावर, मनावर आणि नात्यांवर होणारा परिणाम, नातेसंबंधांचे ओझे यांचा समावेश होतो. वास्तवाचे चमत्कारिक स्वरूप आणि मुळात ‘वास्तव’ म्हणजे तरी नक्की काय, हेही प्रश्न इथे उभे राहतात. ज्याद्वारे मालिका बऱ्याच तात्त्विक स्तरावर जाऊन पोचते. एकमेवाद्वितीय दृश्य शैली आणि अनेकविध वैचारिक संकल्पनांचा मिलाफ मालिकेमध्ये कसा साधला जातो, याकरिता प्रत्यक्ष मालिका पाहणे कधीही इष्ट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com