ऑन स्क्रीन : ‘इन्व्हिन्सिबल’ : मोठ्यांसाठीची सुपरहिरो मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

invincible serial

‘इन्व्हिन्सिबल’ नावाच्याच कॉमिक बुक मालिकेवर आधारित असलेली ही ॲनिमेटेड मालिका सतरा वर्षाच्या एका मुलाला केंद्रस्थानी ठेवून उलगडते.

ऑन स्क्रीन : ‘इन्व्हिन्सिबल’ : मोठ्यांसाठीची सुपरहिरो मालिका

रॉबर्ट कर्कमन हा एक महत्त्वाचा अमेरिकन कलाकार आहे. त्याने निर्माण केलेल्या कॉमिक बुक्स आणि त्यातील काही कॉमिक बुक्सची टेलिव्हिजनसाठी केलेली रूपांतरे अमेरिकेतील पॉप कल्चरचा महत्त्वाचा भाग आहेत. कर्कमन हा ‘द वॉकिंग डेड’ ही लोकप्रिय कॉमिक बुक मालिका आणि याच नावाच्या टेलिव्हिजन मालिकेच्या सहनिर्माणकर्त्यांपैकी एक आहे. त्याने निर्माण केलेली नवी मालिका म्हणजे ‘इन्व्हिन्सिबल.’

‘इन्व्हिन्सिबल’ नावाच्याच कॉमिक बुक मालिकेवर आधारित असलेली ही ॲनिमेटेड मालिका सतरा वर्षाच्या एका मुलाला केंद्रस्थानी ठेवून उलगडते. मार्क ग्रेसन (स्टीव्हन यन) या मुलाचा पिता हा खरंतर ऑम्नी-मॅन (जे. के. सिमन्स) नावाचा एक सुपरहिरो आहे. नुसता सुपरहिरो नव्हे, तर पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली सुपरहिरो! मार्कला त्याच्या वडिलांकडून आनुवंशिकरीत्या काही शक्ती प्राप्त होतात आणि तोही एक सुपरहिरो बनतो. आपल्या पित्याकडून सुपरहिरो असणं म्हणजे काय असतं, हे शिकणं, जगाला वाचवणं आणि हे सगळं करता करता अभ्यास करणं असा त्याचा प्रवास सुरू असतो. मार्कला नव्यानं मिळालेल्या शक्ती, त्याचं किशोरवयीन असणं हा भाग काही प्रमाणात स्पायडरमॅनच्या धर्तीवरील आहे; पण लवकरच मार्कचं आयुष्य आणि त्यासोबत ‘इन्व्हिन्सिबल’ या मालिकेला एक गडद वळण प्राप्त होतं.

मार्कचा पिता अर्थात ऑम्नी-मॅनचं एक रहस्य आहे. तो विल्ट्रम या परग्रहावरून पृथ्वीवर आलेला आहे. इतकी वर्षं पृथ्वीला वाचवणारा सुपरहिरो म्हणून त्यानं ख्याती मिळवलेली असली, तरी त्याचा आणि त्याच्या ग्रहावरील इतर रहिवाशांचा मूळ हेतू वेगळाच आहे. विल्ट्रमचे रहिवासी असलेले सगळे विल्ट्रमाइट्स हे ऑम्नी-मॅनप्रमाणेच प्रचंड शक्तिशाली आहेत. मार्व्हलच्या ‘ॲव्हेंजर्स’मधील थॅनॉसप्रमाणे लोकांचा नरसंहार करण्याचा त्यांचा उद्देश आहे. मात्र, इथला नरसंहार हा थॅनॉसनं केला तसा रँडम नाही. दुबळ्या आणि कमकुवत लोकांची हत्या करून फक्त प्रबळ आणि शक्तिशाली लोकांचं तितकंच सर्वशक्तिशाली विश्व निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. साहजिकच या विश्वावर एकहाती सत्ता प्रस्थापित करणं, ही विल्ट्रम ग्रहवासियांची महत्त्वाकांक्षा आहे. एकंदरीत ऑम्नी-मॅनचं स्वतःचं असं एक तिरसट तर्क आहे. वरवर पाहता लोकांची मदत करू पाहणारा ऑम्नी-मॅन इतरांना थंड डोक्यानं मारून टाकायला मागेपुढे पाहत नाही आणि ऑम्नी-मॅनविरुद्ध दंड थोपटून त्याचा सामना करायचा आहे तो त्याच्या मुलाला, म्हणजेच इन्व्हिन्सिबलला!

‘इन्व्हिन्सिबल’ ही प्रौढांसाठीची ॲनिमेटेड मालिका आहे. मानवी स्वभाव आणि मानवतेची गडद बाजू; तसंच नैतिक द्वंद्वं या काही संकल्पना कर्कमनला फार आवडतात. त्याच्या आधीच्या कलाकृतींप्रमाणेच इथंदेखील या बाबी ठळकपणे दिसतात. त्याचा हेतू हा सुपरहिरोंचं सर्वांना भावेल असं रूप चितारणं नसून त्याच्या अगदी उलट आहे. सुपरहिरो हे जगाच्या भल्यासाठी जे करतात त्यातून हानीच अधिक होते, हा अँटी-सुपरहिरो मालिकांमध्ये दिसणारा मुद्दा इथं अस्तित्त्वात आहे. यात प्रचंड वित्तहानीसोबत जीवितहानीचाही समावेश होतो. त्यामुळे इथं प्रचंड रक्तपात पाहायला मिळतो. ‘मार्व्हल’च्या सुपरहिरोंच्या लोकप्रियतेचा विचार करता सुपरहिरोंकडे पाहण्याचा हा वेगळा दृष्टिकोन फारच महत्त्वाचा ठरतो. ‘इन्व्हिन्सिबल’ ही मूळ कॉमिक बुक मालिका २००३ ते २०१८ या काळात लिहिली गेली होती. आता ती दृक्-श्राव्य माध्यमात रूपांतरित झाली असल्यानं अधिक लोकांपर्यंत पोचतेय, इतकाच काय तो फरक!

Web Title: Akshay Shelar Writes Invincible Serial Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment