ऑन स्क्रीन : जॉयलॅंड : युनायटेड बाय हेट्रेड!

आपले शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तानमध्ये नक्की काय घडते आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते.
Joyland Movie
Joyland MovieSakal
Summary

आपले शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तानमध्ये नक्की काय घडते आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते.

आपले शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तानमध्ये नक्की काय घडते आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. विशेषतः दोन्ही राष्ट्रांमध्ये अनेक सामाजिक, भौगोलिक समानता असताना या घडामोडींकडे बारकाईने पाहणे गरजेचे ठरते. मग या घटना राजकीय-सामाजिक स्तरावरील किंवा मग सांस्कृतिक स्वरूपाच्या असू शकतात.

चित्रपटक्षेत्राचा विचार करता या वर्षभरात एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ने अमेरिकन प्रेक्षक व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावलेले असताना पाकिस्तानी चित्रपटांच्या बाबतीत काय घडतेय, याचे उत्तर फारच रोचक आहे. सईम सादिक दिग्दर्शित ‘जॉयलँड’ या चित्रपटाने कानसारख्या महोत्सवात ‘क्वीअर् पाम’ हा महत्त्वाचा पुरस्कार आणि ज्युरी पुरस्कार मिळवले आहेत. मात्र, ‘आरआरआर’चे व्यावसायिक व अतिमर्दानी रूप आणि ‘जॉयलँड’चा काव्यात्म संयतपणा अशी दोन टोके आशय व मांडणीच्या स्तरावर अस्तित्वात आहेत.

‘जॉयलँड’चे कथानक मुख्यत्वे हैदर (अली जुनेजो) या लाहोरस्थित मुस्लिम पात्राभोवती फिरते. मुमताजशी (रास्ती फारूक) लग्न झालेला हैदर त्याच्या वहिनीसोबत घरकाम करणे, वडिलांची देखभाल करणे या गोष्टींमध्ये रमणारा असला, तरी पारंपरिक पुरुषसत्ताक मुस्लिम समाज व कुटुंबाला त्याचे हे वागणे पटत नसते. बायकोच्या पैशावर जगणारा पुरुष म्हणून त्याच्याकडे काहीशा तुच्छतेने पाहिले जाते. परिणामी बिबा (अलीना खान) या तृतीयपंथी स्त्रीच्या शृंगारनृत्य करणाऱ्या ग्रुपमध्ये सामील होण्याचे काम हाती आल्यावर ते तो स्वीकारतो. हे काम म्हटले तर नाइलाजाने स्वीकारलेले असते, म्हटले तर त्याला बिबाप्रति वाटणाऱ्या आकर्षणामुळे. ज्यानंतर हैदर आणि बिबामधील वाढत जाणाऱ्या आकर्षणासोबतच इतरही अनेक संकल्पना चित्रपटामध्ये उलगडत जातात.

हैदर असेल किंवा घरकामात नव्हे, तर स्वतःच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये रस असणारी मुमताज, जवळपास कसल्याही महत्त्वाकांक्षाच नसलेली वहिनी नुच्ची, समाजाला मान्य असणाऱ्या केवळ दोन लिंगांच्या रकान्यांमध्ये न बसणारी बिबा अशा अनेक पात्रांवर समाजाने लादलेली ओळख (आयडेन्टिटी) ही चित्रपटातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक आहे. हैदर-बिबाच्या पात्रांखेरीज इतरही बऱ्याच छोट्या-छोट्या उपकथा चित्रपटात अस्तित्वात आहेत. ज्याद्वारे समाजाच्या स्त्रीत्व व पौरुषत्वाच्या संकल्पनांसह या अनेकविध आयडेन्टिटींचा ऊहापोह केला जातो.

शिवाय, चित्रपटाला कुणा एका व्यक्तीला दोष देण्यात रस नसून, एकूणच सामाजिक परिस्थिती आणि लिंगभाव याविषयीचे तपशीलवार चित्रण करायचे असल्याचे लक्षात येते. त्यामुळे ट्रान्स प्रेमकथेसोबतच आशियाई देशांतील कुटुंब व त्यातील लैंगिक नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे सांस्कृतिक, सामाजिक वातावरणही चितारले जाते. हे वातावरण सर्वच लिंगांवर समप्रमाणात अन्यायकारक ठरणारे आहे. ज्यामुळे मुमताज, नुच्ची या स्त्रिया किंवा हैदरचे पात्र यांपासून ते कुटुंबप्रमुखापर्यंत प्रत्येक जणाच्या वाट्याला घुसमट येत असल्याचे दिसते.

एकीकडे ‘आरआरआर’ हा अति-मर्दानी, पुरुषी भारतीय चित्रपट जगभरात गाजत असताना ‘जॉयलँड’सारख्या तरल, अलवार पाकिस्तानी चित्रपटाला यश मिळत आहे. असे असूनही पाकिस्तानमध्ये मात्र अगदी अलीकडेपर्यंत ‘जॉयलँड’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. उजव्या धार्मिक गटांनी केलेली ही मागणी पाकिस्तानी सरकारने काही काळ पूर्ण केली असली तरी चित्रपटाचे यश आणि स्वतःच ऑस्कर पुरस्कारासाठी शिफारस केलेली असताना तोंडघशी पडण्याचा हा प्रकार, यामुळे सरकारला ही बंदी हटवावी लागली. त्यामुळे चित्रपटाचा आशय-विषय न पाहता धार्मिक व तथाकथित सांस्कृतिक कारणांमुळे त्याला विरोध करण्याच्या दृष्टीने भारत व पाकिस्तान यांमध्ये अजूनही एकमत आहे, हे दिसून आले! डिव्हाइडेड बाय बॉर्डर्स, युनायटेड बाय हेट्रेड!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com