ऑन स्क्रीन : ‘ट्रँगल ऑफ सॅडनेस’ : मर्यादित स्वरूपाची अर्थपूर्णता

रुबन ऑस्टलंडचा चित्रपट म्हटलं की बऱ्याचशा प्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
triangle of sadness movie
triangle of sadness moviesakal
Summary

रुबन ऑस्टलंडचा चित्रपट म्हटलं की बऱ्याचशा प्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या राहतात.

रुबन ऑस्टलंडचा चित्रपट म्हटलं की बऱ्याचशा प्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अनेकविध मुद्द्यांवरील धारदार, बोचरा उपहास, उत्कृष्ट छायांकन, फार नेमकेपणाने निवडलेली गाणी, समकालीन समाजाविषयीचा उपहास मांडत असताना पात्रांच्या वैयक्तिक आयुष्याकडेही उपरोधाने पाहणे अशा अनेकविध गोष्टी यात येतात. ‘फोर्स मॅजर’ (२०१५) आणि ‘द स्क्वेअर’ (२०१८) या दोनच चित्रपटांतच त्याने त्याची विशिष्ट अशी शैली विकसित केली होती. ‘ट्रँगल ऑफ सॅडनेस’ हा त्याचा नवीन चित्रपट याच प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

‘द स्क्वेअर’मधून समकालीन कला जगतावरील उपहास मांडणाऱ्या ऑस्टलंडच्या नव्या चित्रपटातील टीकेचा रोख समाजातील अतिश्रीमंत, उच्चभ्रू वर्गाकडे आहे. युरोपमध्ये राहणाऱ्या आणि समुद्रपर्यटनाला निघालेल्या काही अतिश्रीमंत पात्रांची ही कथा. ज्यात इंस्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर्सपासून ते बॉम्ब बनविणाऱ्या कारखान्याचे मालक असलेल्या ब्रिटिश जोडप्यापर्यंत सर्वांचा समावेश होतो.

ऑस्टलंडच्या या चित्रपटात सूक्ष्मातिसूक्ष्म सादरीकरणाचा अभाव आहे. उलट अतिशयोक्ती, विक्षिप्तपणा, विरोधाभास आणि एकूणच मांडणीतील अतिरेकीपणा हा इथला स्थायीभाव आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे जगाला तसेच प्रत्येकाच्या आयुष्याला प्राप्त झालेले नीरस, एकसुरी, बेगडी स्वरूप ही चित्रपटातील मुख्य संकल्पनांपैकी एक आहे. चित्रपटातील पात्रांच्या या बोगस आयुष्याचे चित्रण करीत असताना ऑस्टलंडचा विनोद कसा बहरतो, हे पाहणे रंजक आहे. ज्यात सारी पात्रं ज्या जहाजावर आहेत, त्या जहाजावरील कर्मचारी आणि उच्चभ्रू पात्रांमधील दरी, अतिश्रीमंत पात्रांचा उथळपणा आणि हेवेदावे, प्रत्येकाचा विक्षिप्तपणा ठळकपणे दाखवला आहे.

ठळकपणे लक्षात राहतील अशा बऱ्याचशा जागा चित्रपटात आढळतात. सुरुवातीच्या भागात कार्ल आणि याया या जोडप्यामध्ये झालेला वाद किंवा जहाजाचा समाजवादी कॅप्टन (वुडी हॅरलसन) आणि रशियन व्यावसायिक दिमित्री यांच्यातील संवाद यांचा यात समावेश होतो. उदाहरणार्थ, वादळाला सुरुवात झाल्यानंतर जहाजाचा कॅप्टन हा दिमित्रीशी मार्क्स, लेनिन, भांडवलवाद-साम्यवादाची चर्चा करताना दिसतो. त्याने ज्या जहाजाचे सारथ्य करणे अपेक्षित असते ते जहाज वादळातून जात असताना हा कॅप्टन मात्र प्रवाशांना नॉम् चॉम्स्की वाचून दाखवत असतो.

‘द स्क्वेअर’चा प्रभाव आणि चित्रपट जगताला सामाजिक-राजकीय कृतिशीलता आणि सक्रियतेची वाटू लागलेल्या गरजेमुळे अपेक्षित परिणाम साधत ‘ट्रँगल ऑफ सॅडनेस’ने रुबन ऑस्टलंडला ‘पाम डी’ओर’ हा मानाचा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळवून दिला आहे. शिवाय, चित्रपटाच्या सरधोपटपणामुळे त्याला ‘द स्क्वेअर’पेक्षा अधिक मोठा प्रेक्षकवर्ग गवसण्याची शक्यता आहे. ‘ट्रँगल ऑफ सॅडनेस’ सूक्ष्मतेचा अट्टहास सोडून समाजकारण आणि राजकारणाविषयीची अधिक ढोबळ मतं शक्य तितक्या थेटपणे मांडतो. तो अर्थपूर्ण असला, तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. ज्याचा परिणाम इतकाच की, ऑस्टलंडचे याआधीचे चित्रपट त्याच्या एकूण कामात श्रेष्ठ ठरतात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com