ऑन स्क्रीन : ‘वुमन ॲट वॉर’ : पर्यावरणवादी स्त्रीचा एकल लढा

सहसा पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सरकारी किंवा खासगी प्रकल्पांचा विरोध कशा रीतीने केला जातो? एखादी संस्था किंवा काही समविचारी पर्यावरणवादी लोक मोर्चे काढतात.
women at war
women at warsakal
Summary

सहसा पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सरकारी किंवा खासगी प्रकल्पांचा विरोध कशा रीतीने केला जातो? एखादी संस्था किंवा काही समविचारी पर्यावरणवादी लोक मोर्चे काढतात.

सहसा पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सरकारी किंवा खासगी प्रकल्पांचा विरोध कशा रीतीने केला जातो? एखादी संस्था किंवा काही समविचारी पर्यावरणवादी लोक मोर्चे काढतात, सरकारला निवेदने दिली जातात, निदर्शने केली जातात. मात्र, यापलीकडे जाऊन काही केले जाते का, या प्रश्नाचे उत्तर कदाचित ‘नाही’, असेच असेल.

‘वुमन ॲट वॉर’ या चित्रपटामधील नायिका मात्र व्हिजिलॅन्टी पर्यावरणवादी आहे. चित्रपटाची नायिका हात्ला ही आइसलँडमध्ये राहते. तिचे तिच्या देशातील जैवविविधतेवर, निसर्गावर प्रचंड प्रेम आहे. तिथे ॲल्युमिनिअम प्लँटचा घाट घातला गेल्यानंतर त्याला लागणारी जागा, अतिप्रचंड वीजवापर, इत्यादी गोष्टींमुळे पर्यावरणावर अनेक दुष्परिणाम होणार असतात. त्यातूनच या प्रकल्पाला सक्रिय विरोध करण्याची कल्पना हात्लाच्या डोक्यात साकारते. हा विरोध कसा असेल, तर मोर्चा वा निदर्शनाच्या भानगडीत न पडता प्रत्यक्ष कृती करण्याचा! ही कृती म्हणजे ॲल्युमिनिअम प्लँटला वीज पुरवणारी टॉवर्स पाडणे आणि विजेच्या तारा कापणे. अशात एकल आयुष्य जगत असलेल्या हात्लाचा पर्यावरणवादाचा लढा सुरु असताना एक अनपेक्षित बातमी तिला मिळते, ती म्हणजे कधीकाळी मूल दत्तक घेण्यासाठी तिने दिलेला अर्ज मंजूर झाल्याची. मग युक्रेनमधील अनाथ मुलीच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारायची, की पर्यावरणवादी क्रांती सुरू ठेवायची, असा प्रश्न तिच्यापुढे उभा राहतो.

एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल, की चित्रपटातील आशय गंभीर असला तरी त्याची मांडणी बोजड नाही. उलट दिग्दर्शक बेनेडिक्ट अर्लिंगसन गंभीर आशय-विषय फारच मजेशीर व उपरोधिक पद्धतीने मांडतो. सरकार आणि खासगी कंपन्यांमधील लागेबंधे, नागरिकांवर पाळत ठेवणारी, तसेच देशातील पर्यावरण व जैवविविधतेबाबत उदासीन असणारी सरकारे, पोलिस यंत्रणा इत्यादी मुद्दे अर्लिंगसनच्या विनोदाच्या केंद्रस्थानी आहेत. चित्रपटाच्या मांडणीमध्ये पदोपदी आढळणारा विक्षिप्तपणा म्हणजे या दिग्दर्शकाच्या शैलीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

हात्ला एक क्वायर् कंडक्टर आहे. तिच्या कामाच्या सांगीतिक स्वरूपाचा चित्रपटाच्या मांडणीमध्ये केलेला वापर सुरेख आहे. ज्यात वास्तव आणि कल्पिताची सरमिसळ केली जाते. चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात ऐकू येणारी वाद्ये वाजवणारा संगीतकारांचा समूह प्रत्यक्ष चित्रपटात (प्रेक्षकांना तसेच पात्रांना) दिसत राहतो. पियानो, ट्युबा, ॲकॉर्डिअन आणि ड्रम्सवर आइसलँडिक लोकसंगीत वाजवणारे संगीतकार आणि तीन गायिका वारंवार दिसत राहतात. हा वाद्यवृंद हात्लाच्या एकल लढाईला संगीत पुरवतो आणि तिच्या यशापयशावर प्रतिक्रिया देत राहतो. हा भाग ‘बर्डमॅन’मधील (२०१४) पात्राला दिसणाऱ्या ड्रमवादकाची आठवण करून देणारा आहे.

‘वुमन ॲट वॉर’मध्ये दिसणारा निसर्ग आणि मातृत्व यांचा आंतरसंबंध फारच जमून आलेला आहे. दिग्दर्शक अर्लिंगसनच्या चित्रपटात दिसणारे आइसलँडचे सौंदर्य पाहता हात्लाच्या कृतीचे महत्त्व लक्षात येते. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनाथ बनलेली मुलगी असेल किंवा माणसांनी निसर्गावर केलेले अतिक्रमण असेल, दोन्हींमध्ये तसा फारसा फरक नाही. शेवटी मूल दत्तक घेण्यामागील हात्लाची भावना आणि तिला तिच्या मूळभूमी आणि निसर्गाप्रती वाटणारी भावना या दोन्हीतील ममत्वभाव सारखाच नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com