ताशाचा आवाज तारारारा झाला....

marathi songs
marathi songssakal media

ताशाचा आवाज तारारारा झाला....

- आनंद शिंदे

माझ्यावर पार्श्वगायकाचे संस्कार केले ते माझे चुलत भाऊ संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी. मी गायलेल्या ‘दाट गर्दी ग सखे पूना गाडीला’, ‘लिंबू मला मारिला’, ‘पाहुणी आली कशी लाडाला’, ‘सून मेरे अमीना दीदी’, ‘आंटीची घंटी’, ‘हाताला धरलया’, ‘केसा मधी गजरा’ अशा असंख्य अजरामर गाण्यांचे संगीतकार विठ्ठल शिंदेच होते. माझ्या आवाजात भक्तिरसही आहे, हे त्यांनी ओळखून गणपतीच्या सणाकरिता ‘ताशाचा आवाज तारारारा झाला, गणपती माझा नाचत आला’ हे गाणं केलं. ते आजही गणेशोत्सवात म्हंटलं की सर्वांना ठेका धरायला लावतं.

महाराष्ट्राला माझा आवाज कळला आणि रसिक प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला, त्याबद्दल रसिक प्रेक्षकांचे आभार; पण मी घडलो त्यात मोठा वाटा कोणाचा असेल, तर तो आहे माझे चुलत भाऊ संगीतकार विठ्ठल शिंदे यांचा. ते नुसते संगीतकार नव्हते, तर मुंबई विद्यापीठात संगीताचे शिक्षकही होते. वडिलांनी संगीतातील लय, ताल, सूर कसे लावावे, याचे ज्ञान मला दिले असले, तरी त्या गुंणांचा पार्श्वगायक होण्यासाठी कसा वापर करावा, याचे संस्कार माझ्यावर विठ्ठल शिंदे यांनी केले आहेत. म्हणून मी त्यांना गुरुस्थानी मानतो आणि या सदराच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करतो.

महाराष्ट्राच्या लोकसंगीतात आणि लावणी गायनप्रकारात अनेकांनी मोठं योगदान दिलं आहे; पण त्यातील गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी अनेक कलाकारांना मुख्य प्रवाहात आणलं. प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी रोशन सातारकर त्यापैकी एक. रोशनबाईंनी विठ्ठल शिंदेंचं ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ हे गाणं गायलं आणि त्या रातोरात लोकप्रिय झाल्या. आजही ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘गाडी आणावी बुरख्याची’, ‘कारभारी दमानं’ अशा असंख्य लावण्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाजतात त्या त्यांच्याच संगीताने नटलेल्या आहेत.

‘दाट गर्दी ग सखे पूना गाडीला’, ‘लिंबू मला मारिला’, ‘पाहुणी आली कशी लाडाला’, ‘सून मेरे अमीना दीदी’, ‘आंटीची घंटी’, ‘हाताला धरलया’, ‘केसा मधी गजरा’ अशा माझ्या कैक अजरामर गाण्यांचे संगीतकार विठ्ठल शिंदेच होते. माझ्या आवाजात भक्तिरसही आहे, हे त्यांनी ओळखून गणपतीच्या सणाकरिता ‘ताशाचा आवाज तारारारा झाला, गणपती माझा नाचत आला’ हे गाणं केलं.

तेही गाणं आजतागायत गणपती म्हंटलं की सर्वांना ठेका धरायला लावतं.मी सुरुवातीच्या काळात माझे चुलत बंधू संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे कल्याणवरून विक्रोळीला कैक वेळेस चालत जात असे. माझी गाण्याप्रतिची जिद्द पाहून त्यांनी मला संगीताचे धडेही दिले. माझे वडील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्याही गाण्याला विठ्ठल शिंदे यांनीच संगीत दिले होते. म्हणजे पहाडी अवाजाला मंजूळ सुराचे संगीत माझे चुलत भाऊ विठ्ठल शिंदे यांचे होते. माझे ‘नवीन पोपट’ गाणे हिट झाले त्यालासुद्धा त्यांचेच संगीत होते.

विठ्ठल शिंदे हे शिंदे घराण्यातील ते पहिले गायक होते, ज्यांनी चित्रपटामध्ये संगीत दिले व पार्श्वगायनही केले. त्यांचे पहिले गाणे होते ‘सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला.’ माझा आवाज त्यांना खूप आवडायचा. ते नेहमी म्हणायचे, ‘‘आनंद, तुझा आवाज पाण्यासारखा नितळ, अग्नीसारखा तेजस्वी, वादळासारखी ताकत असलेला प्रभावी आहे. कोणत्याही ढंगाचं, रंगाचं गाणं तू तुझ्या आवाजाने उजळून टाकू शकतोस.’’ पोपटानंतर त्यांच्या ९० टक्के गाण्यांना माझाच आवाज आहे.

त्यानंतर जेवढी हिट गाणी मी गायली, ती ‘आंटीची घंटी’, ‘ताशाच आवाज’, ‘केसात गजरा’ अशा अनेक हिट गाण्यांना त्यांचे संगीत लाभले. आनंद शिंदे यांच्या आवाजाने मूर्ती जिवंत झाली असली, तरी त्या मूर्तीचा मूर्तिकार हे विठ्ठल शिंदे आहेत. मला त्यांच्याकडून खूप मार्गदर्शन मिळाले. माझ्या या घडण्यात माझे चुलत बंधू विठ्ठल शिंदे याचंसुद्धा योगदान मोलाचे आहे. फक्त लोकसंगीत लावणी न करता ‘ताशाचा आवाज तारारारा झाला’ हे प्रसिद्ध गाणे देणारे संगीतकारही विठ्ठल शिंदेच होते. म्हणूनच त्यांच्याशिवाय हा आनंद पूर्ण होऊच शकत नाही.

संगीत क्षेत्रातील या प्रवासात मी जसा चाहता रसिकाश्रय कमावला आहे, तशीच मला घडवणारी अनेक माणसंही जोडली आहेत. त्यांनी माझ्या आवाजातील बारकावे हेरले. त्यानुसार गाण्यासाठी प्रोत्साहित केले, त्यात विठ्ठल शिंदे अग्रक्रमावर आहेत. अनेकदा आपल्यात खुपकाही असतं, पण ते आपल्याला दिसत नसतं. गायन-संगीतात ते नेमकेपणाने हेरणारे असतात आणि त्यातूनच कलावंतातील वेगळेपण अधोरेखित होत असतं.

त्याच वेगळेपणातून कलाकारांना ओळख मिळत असते. माझ्या आवाजात काय जादू आहे, ते विठ्ठल शिंदे यांनी हेरलं आणि त्यानुसार त्यांच्या संगीतदिग्दर्शनात मला गाण्याची संधी दिली. त्याच संधीचं मी विनम्रपणे सोनं केलं आहे. लहानपणापासूनच वडील प्रल्हाद शिंदे यांचे संस्कार झाल्यानंतर माझ्यातील स्वरसाधनेला फुलवण्याचे काम मला गुरूस्थानी असलेल्या विठ्ठल शिंदे यांनी केले. त्यामुळे माझ्या गायनातील वेगळेपण अधोरेखित झाले आहे.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com