नवीन पोपट एकाच कार्यक्रमात १५ वेळा गायलं!

माझे ‘नवीन पोपट हा...’ हे गाणे इतके हिट झाले की गाण्याच्या कार्यक्रमांकरिता अनेक ठिकाणी मागणी होऊ लागली. सोलापूर जिल्ह्यातील हुतात्मा स्मृती हॉलमध्ये माझा पहिला कार्यक्रम ठरला. प्रचंड गर्दी. आत जेवढी गर्दी होती, त्याच्या दहापट थिएटरबाहेर लोक होते. माझ्या एंट्रीलाच पोपट गाण्याची धून वाजवली आणि सारा माहोल बदलून गेला. प्रेक्षक खुर्चीवर उभे राहून नाचायला लागले. रसिकांनी शिट्ट्या वाजवून, टाळ्या वाजवून दाद दिली. प्रेक्षकांच्या डिमांडमुळे त्या कार्यक्रमात मला लागोपाठ १५ वेळा नवीन पोपट हे गाणं गावं लागलं...
anand shinde
anand shindesakal

- आनंद शिंदे

मला ‘माझा नवीन पोपट हा...’ या गाण्यामुळे नवीन ओळख मिळाली. माझा पुढचा प्रवास थोडा सोपा झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मला कार्यक्रमांसाठी बोलावणं येऊ लागलं. बंद थिएटरमधील माझ्या कार्यक्रमाला ओसंडून गर्दी असायची. बाहेरही लोक उभे असायचे. पोपटाचे गाणे सुरू झाले की रसिक प्रेक्षक ठेका धरून नाचायचे. खुर्च्यांवर चढायचे. थिएटर डोक्यावर घ्यायचे. थिएटरबाहेर ताटकळत उभे असलेले रसिक हॉलची तोडफोड करायचे. या सर्व प्रकाराला घाबरून अनेक थिएटरमालकांनी माझ्या कार्यक्रमावर बंदी घातली. चांदा ते बांद्यापर्यंत माझ्या कार्यक्रमाला असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. त्यात अनेक बरे-वाईट अनुभव आले. त्या काळी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी होणारा मी पहिलाच कलाकार असेन.

पोपटाचे गाणे हिट झाल्यानंतर मला गाण्याच्या कार्यक्रमाकरिता अनेक ठिकाणी मागणी होऊ लागली. सोलापूर जिल्ह्यातील हुतात्मा स्मृती हॉलमध्ये माझा पहिला कार्यक्रम ठरला. पहिला कार्यक्रम व आपल्या गावातील मुलगा महाराष्ट्रभर गाजत असल्याने लोकांनी मला पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती. हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. आत जेवढी गर्दी होती, त्याच्या दहापट थिएटरबाहेर लोक उभे होते. एवढा प्रचंड जनसमुदाय व त्यांचे प्रेम पाहून माझ्या एंट्रीलाच पोपट गाण्याची धून वाजवली आणि थिएटरमध्ये सारा माहोल बदलून गेला. प्रेक्षक खुर्चीवर उभे राहून नाचायला लागले. रसिक प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवून, टाळ्या वाजवून खूप दाद दिली. प्रेक्षकांच्या डिमांडमुळे त्या कार्यक्रमात मला लागोपाठ १५ वेळा नवीन पोपट हे गाणं गावं लागलं. जे प्रेक्षक आत होते, त्यांनी नाचून नाचून खुर्च्या तोडल्या. जे प्रेक्षक बाहेर उभे होते, ते आतमध्ये येऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी हॉलच्या काचा फोडल्या. प्रेक्षकांनी माझ्या गाण्यासाठी, मला पाहण्यासाठी हुतात्मा स्मृती हॉलचे बरेच नुकसान केले. सदर हॉल हा स्थानिक मनपा प्रशासनाचा होता म्हणून त्यांनी माझ्या त्या हॉलमधील पुढील कार्यक्रमावर पुढची दहा वर्षें बंदी घातली. त्यापुढचे सोलापुरातील सर्व कार्यक्रम मला दमानी हॉलमध्ये घ्यावे लागले.

दमानी हॉलमध्ये माझे लागोपाठ पाच शो झाले, मात्र गर्दी तेवढीच होती. लोकांना बसायला जागा मिळत नव्हती. ती हॉलच्या बाहेर थांबून गाणं ऐकत होती; पण जेव्हा गाणं चालू व्हायचं व रंगात यायचं मग शिट्ट्या वाजवून दाद द्यायच्या नादात ज्यांना हॉलमध्ये जागा मिळाली नाही ते रसिक प्रेक्षक सोडा बॉटल फोडून धिंगाणाही घालायचे. आनंदाच्या भरात हॉलचे नुकसान अनेक वेळा केल्यामुळे दमानी यांनीही हॉल देणं बंद केलं.

सोलापुरातील या दोन प्रसंगांमुळे मग लोकआग्रहास्तव ओपन शो ऑर्केस्ट्रा सुरू केला. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. लोक आदराने, प्रेमाने भेटवस्तू म्हणून सोलापुरी चादर, शाल, हार-तुरे देऊ लागले. ज्या ठिकाणी शो व्हायचे तेथील आयोजक हे शोच्या तिकिटावर मालामाल होऊ लागले. लोक ब्लॅकने तिकीट घेऊ लागले. माझा शो पाहायला मिळाला नाही तरी लोक शोचे बॅनर-स्टिकर घेऊन जायचे, कारण त्यावर माझा फोटो असायचा, एवढं प्रेम मला नाही वाटत कुणाच्या वाट्याला आलं असेल.

एकदा चंद्रपूर जिल्ह्यामधील लालगुडा या गावी शो करायचा ठरला होता. मला घ्यायला आयोजकांनी रेल्वेस्टेशनवर एक वाहन पाठवले होते; पण ती गाडी रस्त्यात बंद पडली. पूर्वी आतासारखी वाहतुकीची साधने नव्हती. रस्त्यात एक टमटम भेटली आणि मी माझ्या वादकांना घेऊन त्या टमटमने जायचे ठरवले; पण टमटममध्ये जागा नव्हती. शेवटी मी तबलजीला आपल्या मांडीवर बसवून तो अर्धा प्रवास करायचा ठरवला. आम्हाला ५० किमी जायचे आहे. प्रवास त्रासदायक होईल म्हणून जायला नकार दिला. ते बोलले की गाडी दुरुस्त करून जाऊ; पण त्याला खूप उशीर होणार होता. प्रेक्षक नाराज होतील. त्यांनी तिकीट काढले आहे. आपल्याला वेळेवर जायला हवे, म्हणून शेवटी तो ५० किलोमीटरचा प्रवास मी तबलजीला मांडीवर घेऊन केला. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात माझ्या कार्यक्रमांना मागणी वाढली होती, म्हणून जास्तीत जास्त शो तेथेही होत होते. त्या भागात झाडीपट्टी रंगभूमी प्रसिद्ध आहे. तिथे नाटकाचे, कव्वालीचे शो चालत असत. एकदा एका कार्यक्रमाला गेलो असताना, मी व माझे सहकारी यांची गावात एका पडक्या घरात सोय केली. त्यावेळी गावात काही हॉटेल, लॉज नसायचे. मग गावातच सोय केली जायची. कार्यक्रम सुरू करण्याआधी तालीम सुरू केली. मी खिडकीनजीक थांबलो होतो. तेथे माझ्या बाजूला कारदांड्या प्रकारातील एक विषारी साप होता. माझे लक्ष नव्हते. मला तो साप आहे, हे लक्षातच आले नाही. माझ्या बाजूला त्या गावातील माझा मित्र मुन्ना होता. त्याला तो साप दिसला व त्याने माझा जीव वाचवला. आयोजकांनी केलेल्या गैरसोयीमुळे माझा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे माझे सहकारी आयोजकांवर नाराज झाले. जीव गेला असता. त्यामुळे हा कार्यक्रम करायचा नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. मात्र त्यात प्रेक्षकांची काय चूक, असं म्हणत मी वादकांची समजूत काढली आणि तो कार्यक्रम केला.

एकदा गडचिरोली जिल्ह्यातील एका दुर्गम भागात कार्यक्रम करत होतो. कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. कार्यक्रम सुरू असताना अचानक हत्यारबंद माणसे तिथे आली. मला व आयोजकांना वाटले की, ते माझा कार्यक्रम बंद पाडायला आले; पण झाले वेगळेच. त्यांनी माझ्यावर पैसे उधळले व माझ्या गाण्यांना दाद दिली. नंतर कळलं ते नक्षलवादी होते!

गडचिरोलीमध्ये अनेकदा कार्यक्रमसाठी जात होतो. त्यामुळे माझी आणि बाबा आमटे यांची भेट झाली. अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यातून आमच्यात एक छान नाते तयार झाले होते. मला बाबांचा आशीर्वाद, सहवास लाभला होता. कुष्ठरोग्यांचे सेवाव्रत घेतलेले बाबा मला खूप भावले. एकदा मी आणि माझी पत्नी विजया शिंदे सोमनाथला गेलो असताना, एक कुष्ठरोगी मला शेतात काम करताना दिसला; पण त्याच्या अंगावर काही नव्हते. थंडीत तो काम करीत होता. मी माझ्या अंगातला सदरा त्याला घालायला दिला व संपूर्ण सोमनाथ मी बनियानवर फिरलो. बाबा आमटे मला सांगायचे, ‘‘तुमचे वडील स्वरसम्राट प्रल्हादजी यांची गाणी मी खूप ऐकतो. त्याच बरोबर तुमची गणपती गीते व लोकगीतेसुद्धा मी ऐकत असतो.’’ त्यांच्यामुळे आदिवासी पाड्यासोबत एक वेगळेच नाते जुळले.

अनेक वेळा दुर्गम भागात लांब प्रवास असल्याने कार्यक्रम चालू व्हायला वेळ लागत होता. तिकडे पोहचल्यावर लगेचच मी कार्यक्रम चालू करत असे; पण आयोजक मला जेवून घ्या व नंतर कार्यक्रम करा, असे सुचवायचे. पण माझ्या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमापोटी मी लगेच कार्यक्रम चालू करून, आयोजकांना सांगायचो की, ‘पहेले गाना फिर खाना.’ हे सूत्र मी आजतागायत पाळतोय. असे अनेक मजेशीर किस्से, आठवणी आहेत. हळूहळू उलगडत राहू...

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com