निर्माती अनुष्का... 

 Anushka Sharma a producer
Anushka Sharma a producer

आगामी "फिल्लौरी' या चित्रपटातून दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती तसेच त्यामध्ये अभिनय करणाऱ्या अनुष्का शर्माबरोबर तिच्या निर्माती म्हणून झालेल्या प्रवासाबद्दल केलेली ही बातचीत- 

"एनएच 10' नंतर तुझा हा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे.तुझ्याबरोबरच आता अन्य नायिकाही चित्रपटनिर्मितीमध्ये उतरलेल्या आहेत. चित्रपटसृष्टीत हा एक नवीन पायंडा तू अत्यंत कमी वयात पाडला आहेस, काय सांगशील? 

- मी काही हे सर्व ठरवून केलेलं नाही. या इंडस्ट्रीत मी असं काही करीन असं मला वाटलंही नव्हतं. मी अभिनेत्री बनले ते योगायोगानेच आणि निर्मातीही. चित्रपटात काम करत असतानाच माझ्याकडे एक चांगली कथा आली आणि त्यावर आपणच चित्रपट बनवूया असं मी पक्कं केलं. हे सगळं योगायोगानेच झालं. माझे आई-वडील देहरादूनचे. माझे वडील आर्मीत होते. त्यामुळे लहानपणापासूनच मी धीट आणि धाडसी स्वभावाची होते. कशाचीही भीती माझ्या मनात तेव्हा नव्हती आणि आताही नाही. चित्रपटनिर्मिती केल्यानंतरही कधी मनावर दडपण आलं नाही किंवा कसलीही चिंता केली नाही. सातत्याने काम करीत राहिले आणि त्याचं फळ मला मिळालं. 

तरीही करिअरच्या एका यशस्वी टप्प्यावर असताना चित्रपटनिर्मिती करणं हे एक धाडसच म्हणावं लागेल. नाही का? 
- आव्हान हे प्रत्येक क्षेत्रात असतं. आता तुम्ही त्याला कसं सामोरं जाता हे महत्त्वाचे आहे. जेव्हा मी चित्रपटसृष्टीत आले तेव्हा अनेक समस्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या; पण प्रत्येक प्रसंगाला मी तितक्‍याच धिटाईने सामोरे गेले. कारण कोणतंही काम करताना माझ्या आतील आवाज माझ्याशी संवाद साधतो आणि मग ते काम मी करते. पहिल्या चित्रपटाची मी जेव्हा निर्मिती केली तेव्हा इंडस्ट्रीतील काही मंडळींनी नाकं मुरडली. काही जणांनी मला चुकीचे सल्ले दिले. चित्रपटनिर्मिती तू का करतेस? अशा प्रश्‍नांनी भंडावून सोडलं; पण मी माझं पाऊल मागे टाकलं नाही. जेव्हा एखाद्या नायिकेचे चित्रपट अयशस्वी होत असतात तेव्हा ती वेगळा मार्ग स्वीकारते. त्यावेळी ती एखाद्या चित्रपटाची निर्मिती करते. मला अशा काही मंडळींचं लॉजिक समजलंच नाही. ही मंडळी अशी का बोलतात? या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. आज माझे चित्रपट पाहायला प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. मग मी चित्रपटनिर्मिती केली तर ते का पाहणार नाहीत? मी खूप विचार केला आणि चित्रपटनिर्मिती केली. चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर हीच मंडळी मला पुन्हा भेटली आणि काय... आपने बहोत अच्छी फिल्म बनायी... आप प्रोड्युसर बन गयी, बहोत अच्छा लगा हमे... अभी दुसरी फिल्म कौनसी प्रोड्युस करनेवाली हो... हम कुछ मदत करे क्‍या... मला या मंडळींचे मग आश्‍चर्य वाटलं. आपल्या इंडस्ट्रीत अशी दुतोंडी माणसं आहेत हे मी जाणलं. 

 चित्रपट निर्माती म्हणून तू काय शिकलीस? 
- बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्या. पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा मला काही गोष्टी माहीत नव्हत्या. त्या मी जाणून घेतल्या. त्यावेळी काही राहिलेल्या त्रुटी आता भरून काढल्या आणि आता काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पुढील वेळी निश्‍चित भरून काढणार आहे. कारण निर्माती मी झाले त्याला मुख्य कारण म्हणजे आपण ज्या समाजात राहतो किंवा काम करतो त्याला आपण काही तरी चांगले दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि मी चित्रपट काढला. महत्त्वाचं म्हणजे पहिला चित्रपट आणि आताचा "फिल्लौरी' चित्रपट काढताना दोन्ही वेळी वेगवेगळा अनुभव आला. दोन्ही चित्रपटांच्या वेळी समस्या आणि काही अचानक उद्‌भवलेले प्रसंग वेगळे होते. त्याला मी माझ्या पद्धतीने सामोरी गेले. 

एक यशस्वी अभिनेत्री-निर्माती असा तुझा हा प्रवास तुला सुखद वाटतोय का? 
- हा प्रवास आनंददायी आहे. अभिनेत्री म्हणून माझ्या करिअरला टर्निंग पॉइंट देणारा चित्रपट होता तो "बॅण्ड बाजा बारात.' या चित्रपटामुळे मला बरंच काही शिकता आलं. खरं तर मी माझ्या आतापर्यंतच्या संपूर्ण करिअरमध्ये मोजकेच चित्रपट केले आणि विशेष म्हणजे विविध मंडळींबरोबर केले. मला असं वाटतं की विविध मंडळींबरोबर काम केलं की बऱ्याच गोष्टी जाणता येतात. कारण प्रत्येकाच्या कल्पना, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते. एक कलाकार म्हणून काही तरी वेगळं काम केलं आणि करीतही आहे. तसंच निर्माती म्हणूनही वेगळं काही तरी प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतेय. 

चित्रपटाच्या कथेबरोबरच त्याची कास्टिंग खूप महत्त्वाची असते. तू तुझ्या चित्रपटामध्ये नवोदित कलाकारांनाच अधिक संधी दिलीस त्याबद्दल काय सांगशील? 
- नवोदित कलाकारांकडे टॅलेंट खूप असतं; पण त्यांना संधी मिळत नाही. एकेकाळी मीही नवीनच या इंडस्ट्रीत होते. मला "यशराज'सारख्या एका बड्या बॅनरने संधी दिली. त्यामुळे नवीन कलाकारांतील टॅलेंट पुढे आणणं आवश्‍यक आहे असं मला वाटतं. फिल्लौरीमध्ये दिलजित दोसांज, सूरज शर्मा आणि मेहरीन असे काही कलाकार काम करतायत. त्यातील दिलजित दोसांज हा पंजाबी अभिनेता आहे. त्याचे अल्बम आणि काही पंजाबी चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत. त्याचा एक पंजाबी चित्रपट मी पाहिला आणि आमच्या चित्रपटाचा दिग्दर्शक अंशय लाल याच्याशी मी चर्चा केली. त्यानंतर आम्ही त्याचं नाव निश्‍चित केलं. सूरज शर्माबद्दल सांगायचं झालं तर माझ्या भावाला त्याची ऍक्‍टिंग आवडते. "लाईफ ऑफ पाय'मध्ये त्याला पाहिलं. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की त्याला हिंदी येत नसावं; परंतु जेव्हा आम्ही त्याला फोन केला तेव्हा त्याने हिंदी भाषेत आमच्याशी संवाद साधला. ही कलाकार मंडळी उत्तम आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शक अंशय लालने मला ही कल्पना सांगितली आणि त्यावर चित्रपट काढण्याचा आम्ही निर्णय घेतला. ही एका भुताची प्रेमकथा आहे. 

सोशल मीडियावर तुझ्याबद्दल जे कॉमेंट्‌स येतात त्याबद्दल तुला काय म्हणायचंय? 
- सोशल मीडियावर माझ्याबद्दल अनेक प्रकारची टीकाटिप्पणी झाली आहे आणि होतही आहे. ज्यांना कामं नाहीत अशी मंडळी असा उद्योग करीत असतात. त्यामध्ये चांगली शिकली-सवरलेली माणसेही आहेत. तुम्हाला काही काम नसलं तर तोंड बंद ठेवा...गप्प राहा. उगीच अशी टीकाटिप्पणी करू नका. कशाला कुणाची बदनामी करता? 

प्रादेशिक भाषेत चित्रपट काढणार का? 
- प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना चांगले दिवस आलेले आहेत ही बाब खरी आहे. मला चांगली कथा मिळाली तर पंजाबी किंवा मराठी चित्रपट नक्कीच काढेन. मनोरंजनाच्या क्षेत्रात जे काही चांगले करता येईल ते करण्याचा माझा विचार आहे. आता आम्ही वेबसिरीजही बनविणार आहोत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com