'उघडपणे माझी खिल्ली उडवली'; अपूर्वाने सांगितलं 'शेवंता' सोडण्यामागचं कारण | Apurva Nemlekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi actress apurva nemalekar

'उघडपणे माझी खिल्ली उडवली'; अपूर्वाने सांगितलं 'शेवंता' सोडण्यामागचं कारण

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' Ratris Khel Chale या मालिकेत शेवंताची Shevanta भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर Apurva Nemlekar घराघरात पोहोचली. या भूमिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र आता या मालिकेत शेवंताच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. अपूर्वाने ही भूमिका का सोडली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडत असतानाच आता तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित त्यामागचं कारण सांगितलं आहे.

अपूर्वा नेमळेकरची पोस्ट-

'शेवंता, बस नाम हीं काफी हैं, पर कभी कभी ये इतनाहीं काफी नहीं होता. शेवंता म्हणून आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले. खरं सांगायचं तर शेवंताचे सादरीकरण हे मला सहज जमत गेले, जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य, त्या व्यक्तीरेखेतील विविध पैलू, निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली. शेवंता ही भूमिका मला खूप काही देऊन गेली.

असे सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की मी शेवंताच्या भूमिकेचा का त्याग केला? असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कमेंटमार्फत, ईमेल्समधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्यांचं उत्तर देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे आणि या गोष्टीचा उलगडा करणे हे माझं कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे.'

'शेवंता या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबन केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केले गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी त्यावर कारवाई केल्यानंतरही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही.

तुम्हाला माहितीच आहे की रात्रीस खेळ चालेचं शूटिंग हे सावंतवाडीत चालू आहे. मी मुंबईवरून १२ तासांचा ट्रेननं प्रवास करून जात होते. मला शूटिंग करता बोलावल्यानंतर फक्त एक दिवस शूट करून नंतर ३-४ दिवस काहीच शूट केल जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ ६-७ दिवसच काम लागत होतं आणि त्याकरिता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.

प्रॉडक्शन हाऊसकडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सिझनसाठी तुमचे आम्हाला ५ ते ६ दिवसच लागणार आहेत म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एख शो देण्याचं आश्वासन दिलं गेलं. परंतु ५ ते ६ महिने झाले, अद्याप ते आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळे माझं आर्थिक नुकसान होत आहे.'

हेही वाचा: निलेश साबळे नारायण राणेंच्या पाया पडले; 'त्या' भूमिकेसाठी माफी!

'असाच प्रकार गेल्यावर्षी सुद्धा झी युवावरील 'तुझं माझं जमतंय' या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही. म्हणून त्याबाबतसुद्धा चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही, असं आश्वासन दिलं गेलं होतं. अद्यापपर्यंत तो चेक मिळाला नाही आणि तेसुद्धा आश्वासन पाळलं गेलं नाही.

मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल आणि माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना जिथं होत असेल आणि नवख्या कलाकाराकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला.

या सर्व पार्श्वभूमीवर मला जिव्हाळ्याच्या शेवंतातून बाहेर पडावं लागलं. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथेच थांबले नाही. आणखी काही नवीन रोल्स मी करत राहीन. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील अशी मी आशा करते. हीच एकमेव प्रेरणा आहे.'

अपूर्वाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिची साथ दिली आहे. मालिकेचा ५० टक्के प्रेक्षकवर्ग कमी होणार, असं एकाने लिहिलं. तर तुझा निर्णय योग्य आहे, असं दुसऱ्याने म्हटलं. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत आता शेवंताची भूमिका अभिनेत्री कृतिका तुळस्कर साकारणार आहे.

loading image
go to top