दिग्दर्शक होण्याचा इरादा : अर्शद वारसी

संतोष भिंगार्डे
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सगळ्यांचा लाडका सर्किट अर्थात वन ऍण्ड ओन्ली अर्शद वारसी. आज त्याचा "इरादा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचित

तू महेश भट यांच्याकडे असिस्टंट डिरेक्‍टर म्हणून काम करत होतास. मग अचानक ऍक्‍टिंग करावी असं तुला का वाटलं? 

सगळ्यांचा लाडका सर्किट अर्थात वन ऍण्ड ओन्ली अर्शद वारसी. आज त्याचा "इरादा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचित

तू महेश भट यांच्याकडे असिस्टंट डिरेक्‍टर म्हणून काम करत होतास. मग अचानक ऍक्‍टिंग करावी असं तुला का वाटलं? 

- ऍक्‍टिंग मला करायचीच नव्हती. मला दिग्दर्शकच व्हायचं होतं. पण मी महेश भट यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करीत होतो तेव्हापासूनच ऍक्‍टिंगच्या ऑफर्स येत होत्या. मी कित्येक ऑफर्स तेव्हा नाकारल्या. पण नशिबाच्या पुढे कुणी जाऊच शकत नाही. मला वाटतं, माझ्या नशिबात ऍक्‍टिंगच लिहिलेली होती आणि झालो मी ऍक्‍टर. तरीही दिग्दर्शक होण्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे आणि एके दिवशी मी दिग्दर्शक होणारच आहे. माझा पुढील इरादा तोच आहे. 

त्यामुळेच तू अलीकडे खूप कमी काम करताना दिसतोस आणि कुटुंबाला अधिक वेळ देतोस. हे खरंय का? 
- माझ्याकडे कामाची कमतरता आहे असं नाही. चित्रपटांच्या ऑफर्स नेहमी येतच असतात. पण मी इतर कलाकारांसारखा नाही. आज एक चित्रीकरण... उद्या दुसरं आणि मग तिसरं... मला ते जमत नाही आणि जमणार नाही. कारण मी अतिमहत्त्वाकांक्षी नाही. मी माझ्या कामापेक्षा कुटुंबाला अधिक प्राधान्य देतो. मी माझं काम आणि कुटुंब यांच्यामध्ये नेहमी समतोल साधतो. कधी मुलांबरोबर पिकनिकला जायचं असेल आणि त्याच वेळी चित्रपटाची ऑफर आली तर मी ती स्वीकारत नाही. त्यांना नकार देतो. 

पण सध्या स्पर्धा खूप आहे. नवनवीन टॅलेंट येत आहे. या स्पर्धेच्या युगात तुला असुरक्षित वाटत नाही का? 
- अजिबात नाही. ज्यांना काम येत नाही त्यांना असुरक्षितता वाटते. कारण आपल्याकडील काम आपल्या हातून निसटून जाईल याची त्यांना भीती वाटते. मला तसं काही वाटत नाही. माझ्याकडे कामाची कमतरता नाही. एक जमाना असा होता, की मोठमोठे सुपरस्टार्स होते; पण ते टॅलेंटेड नव्हते, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांची ती वेळ चांगली होती. त्यामुळे त्यांचे चित्रपट चालले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्‍यावर घेतले. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर कामाची अजिबात चिंता करायची नाही. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आजही काम करताहेत. कारण त्यांच्याकडे टॅलेंट आहे. 

मग तुझ्या मते टॅलेंट महत्त्वाचं की लक फॅक्‍टर महत्त्वाचा? 
- लक फॅक्‍टर हा आवश्‍यक असतोच. माझं नशीब चांगलं होतं म्हणून माझे एकामागोमाग एक चित्रपट चालले. परंतु लक फॅक्‍टरपेक्षा टॅलेंट महत्त्वाचं आहे. गॉडफादर, लक फॅक्‍टर या गोष्टींपेक्षा माझा अधिक भरवसा टॅलेंटवर आहे. टॅलेंट असलं तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. 

तुझा पहिला चित्रपट "तेरे मेरे सपने' प्रदर्शित झाल्यानंतर तुझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता मागे वळून पाहताना तुला काय वाटतंय? 
- मला तेव्हा काहीही विशेष वाटलं नव्हतं. मी चांगलं काम केलंय, असं मला तेव्हा अजिबात वाटलं नाही. मात्र अन्य मंडळी मला सांगत होती आणि मी ते ऐकत होतो. मात्र थोड्याच दिवसांनी माझी खात्री पटली, की आपण खरोखरच चांगलं काम केलं आहे. त्यानंतर मी पुढे कशा पद्धतीने काम केलं हे सगळ्यांना ठाऊकच आहे. सर्किटने मला वेगळी ओळख दिली. ही भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची होती आणि मी ती चांगलीच एन्जॉय केली. काही जण भूमिकेकरिता तयारी वगैरे करीत असतात. पण मी कधीच तशी काही तयारी करीत नाही. अगदी सर्वसामान्य माणसं जशी वागतात, त्याप्रमाणे मी काम करतो. अर्थात ऍक्‍टिंग नैसर्गिकच व्हायला पाहिजे, हा माझा कटाक्ष असतो. 

तू "जॉली एलएलबी' केला होतास. मग त्याच्या सिक्वेलमध्ये तू का नाहीस? 
- प्रॉडक्‍शन हाऊस एका मोठ्या कलाकाराला घेऊन हा चित्रपट बनवणार असं मला समजलं होतं आणि त्यांचा तो निर्णय योग्य होता, असं मला वाटतं. कारण मी हा चित्रपट केला असता तर तीस किंवा चाळीस कोटी रुपयांचा व्यवसाय त्याने केला असता. आता अक्षयने केला आहे म्हटल्यानंतर नक्कीच तो शंभर कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करेल. अक्षयकुमार आणि सुभाष कपूर हे दोघेही माझे मित्र आहेत. त्यांच्या निर्णयाचा मी आदरच करतो. 

"इरादा' चित्रपटात तू पोलिसवाला बनला आहेस. त्याबद्दल काय सांगशील? 
- आपल्याकडील सिस्टिमला कंटाळलेला हा पोलिसवाला आहे. पोलिसांनी कितीही आटापिटा केला तरी पुढे काही होत नाही. त्यामुळे तो हताश आणि निराश असतो. अशी ती भूमिका आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाहदेखील आहेत. त्यांच्याबरोबर यापूर्वीही मी काम केलंय. ती अभिनयाची संस्था आहे. ते चित्रपटाचे संवाद चांगले लक्षात ठेवतात. त्यांचा हा गुण आपल्यात यावा असं मला वाटतं. 

"इरादा' हा इको पण थ्रिलर टच असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी काही विशेष करावं लागलं का? 
- मला कोणत्याही भूमिकेत शिरण्यासाठी वेळ लागत नाही. मी भूमिकेचा फार अभ्यास करत नाही; पण मी अतिशय मन लावून मी स्क्रिप्ट ऐकतो, वाचतो. त्यामुळे ती भूमिका चित्रपट संपेपर्यंत डोक्‍यात राहते. अभिनय निर्सगत: माझ्याकडून खुलतो. 

आता तू स्टार आहेस, काय वाटतंय या क्षणी तुला? 
- मी या गोष्टीचा विचार कधीच केला नाही. मी स्वतःला स्टार कधीच समजलो नाही. माझं वागणं आणि बोलणं स्टार्ससारखं नाहीच. मी अगदी सर्वसामान्य माणसासारखा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arshad warsi wants to be director