स्त्री-पुरुष समानतेची मूल्यं आणि मुरलेला मुरांबा 

सुनील सुकथनकर  
सोमवार, 3 जुलै 2017

काही दिवसांपूर्वी आलेल्या मुरांबा या चित्रपटाची चांगली चर्चा झाली. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये चालू आहे. या निमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटाचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. प्रत्येक सिनेप्रेमीने वाचावा असा हा लेख खास इ सकाळच्या वाचकांसाठी.  

मुरांबा पाहिल्यावर मनात एक सुखद चव रेंगाळत रहाते.... ती चव चित्रपट पहाताना आलेल्या अनुभवाची तर आहेच पण त्याच बरोबर आत खोलपर्यंत एक समाधानाची जाणीव पोचलेली असते, त्यानं त्या रेंगाळणाऱ्या चवीत आपल्याला रमायला आवडतं... 
हे समाधान आहे त्यातल्या पात्रांच्या नातेसंबधातल्या गोडव्याचं (गोडगट्टपणा नव्हे), समजुतीचं (तडजोडीचं नव्हे), आधुनिकतेचं (खऱ्या आधुनिकतेचं-पोषाखी नव्हे) आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मुरलेल्या व्यक्त-अव्यक्त गुंफणीचं....! 

स्त्री-पुरुष समानता हा विषय साठीच्या दशकात चेष्टेचा, सत्तरीच्या दशकात नवलाईचा, ऐंशीच्या दशकात प्रयोगाचा, नव्वदीच्या दशकात प्रतिहल्ल्याचा, शतक संपताना नव्या उत्साही कुचेष्टेचा होत होत गेल्या दशकात तर दूरदर्शन मालिकांमधून काटशह देत पराभव करण्याचा विषय झाला आहे. माझी पिढी या नव्या जाणीवेतून स्वत:ला समृद्ध करून स्त्री बरोबरच्या नव्या मैत्रीच्या प्रयोगातून स्वत:ला बदलू पहात होती.... मुरांबातला बाप आमच्या पिढीच्या थोड्याच आधीचा... त्यामुळे तो या भावनेतून गेलेला असणार... दिग्दर्शक वरूण नार्वेकर आमच्याबरोबर अनेक वर्षं काम केलेला... त्याच्या कथेतला नायक आणि नायकाचा बाप यांच्या पिढीतला दुवा....सुमित्रा भावेंसारख्या आणखी आधल्या पिढीतल्या लेखिकेच्या संहितांमधल्या सशक्त स्त्री-व्यक्तिरेखा त्यानं आमच्या बरोबर तयार होत पडद्यावर प्रकटताना पाहिल्या आहेत.... माझ्यासारख्या अनेकांकडे पहात त्यानं त्याची स्वतःची एक स्त्री-मुक्तीची सकारात्मक मांडणी मनात करत करत, त्याला स्वतःच्या आयुष्यातल्या प्रयोगांची जोड देत त्याचं स्वयंपूर्ण समीकरण बनवलं आहे... आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते आपल्या चित्रपटातून व्यक्त केलं आहे.... 

"चित्रपट हा काय समाज-प्रबोधनाचा उद्योग आहे का " असा पोरकट प्रश्न आमच्याच एका पूर्वीच्या सहाकाऱ्यानं स्वतंत्र दिग्दर्शक झाल्यावर विचारून आम्हांला हतबुद्ध केलं होतं.... आपल्या चित्रपटातली मूल्यव्यवस्था ही डोक्‍यावर टोपी ठेवल्यासारखी उपरी नसते, मुखवट्यासारखी वरतून चढवायची नसते... ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असते.. आणि आपला चित्रपट जर आपण प्रामाणिक पणे बनवला तर ती त्यात आपसूक उतरते.... फुलाचा सुगंध अत्तरात उतरावा तशी....त्यामुळे "आम्ही बुवा मनोरंजन वाले" असं लेबल स्वतःला लावून काही चित्रपट वाले स्वतःची आणि प्रेक्षकांची दिशाभूल करत असतात.... अगदी "शोले" हा यशस्वी व्यावसायिक चित्रपटसुद्धा कैदी आणि समाज या नातेसंबधांवर भाष्य करतच असतो...किंवा ठाकूरच्या विधवा सुनेवर प्रेम करणाऱ्या जयचा मृत्यू घडवून व्यवस्थेला न बदलण्याचा घाबरटपणाही करत असतो... 

आपण भाबडे प्रेक्षक समोरच्या प्रतिमांचं विश्‍लेषण करण्याची कुवत नसल्यामुळे फसत रहातो आणि त्या फसगतीचं उदात्तीकरण करत रहातो...नुकत्याच आलेल्या बाहुबली बद्दल अगदी आपण मराठी मंडळी देखील सांस्कृतिक चेव फुटल्याप्रमाणे महान भारतीय संस्कृतीचं प्रतीक त्या बाळबोध चित्रपटाला मानून आपल्याच चित्रपटांची निंदा-नालस्ती करतो...कमी कपड्यापल्या चार वारांगनांना अंगावर खेळवणारा बाहुबली जेंव्हा धाडसी नायिकेची गोडगोड आकर्षक शोभेची बाहुली बनवतो तेंव्हा तो स्त्रीला दुय्यम लेखण्याच्या महान भारतीय संस्कृतीचे पांग फेडतच असतो म्हणा.... " बाहुबली " च्या नावाचा जप करणारी असहाय प्रजा दाखवून आपण आजही कुठल्यातरी मसीहाच्या कृपेची वाट पहाणारा बावळट समाज आहोत हेच तो चित्रपट अधोरेखित करत असतो...आजची राजकीय परिस्थिती ते खरं तर सिद्धच करते आहे.... (मुरंबा सहित अनेक मराठी चित्रपटांची निंदा करत बाहुबली ला महान ठरवणारा एक लेख सध्या इतस्ततः फिरत असल्यामुळे हे भाष्य!!) 

या पार्श्वभूमीवर "मुरांब्या"तले स्त्री-पुरुष वेगळे आहेत....ते एक मराठी उच्च-मध्यमर्गीय कुटुंब आहे... तेही नुकतंच मध्यमवर्गीय पणातून कष्टानं वर येत वरच्या वर्गात आलेलं....त्यामुळे ते स्त्री-पुरुष समानतेविषयी वैचारिक भूमिका मांडणारे बुद्धिजिवी नाहियेत.... त्यांचं न्यायाचं वागणं अधिक लोभस आहे....यातील बाप चक्क गोड आहे.... बायकोवरच्या प्रेमातून तो तिच्या साठी चहा करायला लागलाय... त्याला त्यासाठी कुठल्या चर्चेची गरज नाही! तिच्या साडीच्या निऱ्या धरताना तो गुढघ्यावर देखील बसतो.... हे तर वर्तणुकीतलं झालं.. पण मुलगा तिला कमी शिकलेली म्हणून हिणवतो तेंव्हा तो मुलाची-त्याच्या मैत्रिणिची- नवी संस्कृती समजून घेण्याच्या तिच्या बुद्धिमान प्रयत्नांची बूज राखायला आपल्या मुलाला शिकवतो... आपल्याला अहो-जाहो करणारी, वरकरणी "टिपिकल" वाटणारी आपली पत्नी आपल्याला ताळ्यावर आणणारी शक्ती आहे हे अभिमानानं तो सांगतो.... 

वडलांना पुरुषी आणि आईला जुनाट ठरवण्याचा घोटाळा करणारा मुलगा मुळात समानतेचा विचार समजून घेणारा आहे.. पण पुस्तकी समजुतीपेक्षा "मुरलेल्या" नात्याकडे वेगळं पहायला हवं हे त्याला अजून उमजलेलं नाही...त्याचा तो बदलाचा प्रवास त्याला आई-वडलांची आणि मैत्रिणिचीही नवी आधुनिक ओळख घडवतो....आणि त्यालाही नवा " शहाणा" समानतेची लज्जत उमजलेला आधुनिक तरूण बनवतो..... 

"मुरांब्या"तली स्त्री-पुरुष समानतेची जाणीव आणखी एका बाजूने खूप "मुरलेली" आहे.... यातली नायिका-जी घरची सून बनणार आहे- ती सध्या मालिकांमधून दिसणारी सोशीक, साडी नेसलेली, पवित्र नाहिये... ती तिच्या मित्राइतकीच आगाऊ, चक्रम, आतून जबाबदार पण बिनधास्त आणि प्रयोगशील आहे... प्रेक्षकातल्या काही भावी सासवांना झीट आणण्याची तिची पात्रता आहे...! आणि ही वरकरणी भाबडी वाटणारी नायकाची आई- बाळबोध बावळटपणा न करता तिच्यावर मनमोकळं प्रेम करते आहे..साध्या भोळ्या बाईला बुद्धीही नसते हा मालिकांमधून दृढ होणारा गैरसमज दूर करण्याची क्षमता या आईत आहे.... 

"मुरांब्या" तले स्त्री-पुरूष Politically correct करण्याचा अट्टाहास लेखक-दिग्दर्शक वरूणनं टाळलाय...त्यातली पात्रं प्रसंगी आजच्या सेन्सॉरला घाबरवणारी भाषा बोलतात... काही वर्तणुकीही करतात..... पण तो धीटपणा खोटा आव आणलेला नाही... आणि त्यापलिकडे असणारा त्यांच्यातला चांगुलपणा हाही तडजोड म्हणून आलेला नाही... तो त्या पात्रांच्या व्याक्तिमत्त्वाचा भाग आहे... पर्यायानं तो वरूणच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे..... 

"मुरांबा" चित्रपटगृहात असताना त्यावर अती तपशिलांत लिहिणं हे तो चित्रपट पाहायला जाऊ इच्छिणाऱ्या अनेकांच्या साठी रसभंग करणारं होईल म्हणून मला यातली अनेक उदाहरणं देत बसायची नाहीत... ती तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर पहा....एक नक्की की, "मुरांबा" आजचा आहे.... शिळा नाही....नायकाचे भावी सासरे एप्रन बांधून शेंगा भाजत असतात हे दिग्दर्शकानं "निवडलेलं" दृष्य आहे.....नायिकेच्या वेशभूषेचं स्वतः साडी नेसणाऱ्या आईनं केलेलं कौतुक प्रेक्षकाला काहीतरी सांगतंय....बाप-मुलगा दोघंही घरात हाफ-पॅंट-टी-शर्ट मध्ये असणं हा "चॉईस आहे....भिंतीवरचे SD आणि RD बर्मन आपल्याला काहीतरी सांगताहेत....बापानं फिरायला जाताना सापडलेला दगड उचलून आणणं हे आई आदरानं स्वीकारते आहे....दारू न पिण्याचं वचन घेतलेल्या आईला मुलगा-भावी सून यांच्या बरोबर बाप वाईन ऑफर करतो आहे..... बायका पुरूषांना खरं-खरं शहाणपण शिकवताहेत आणि ते त्यांना पटतंय....(नेहमीच्या "बायका बडबडतात-आपण दुर्लक्ष करायचं"-या समजुतीला धक्का लागतोय...!) कमावती, स्वतंत्र, कर्तृत्ववान मुलगी दुष्ट पात्र नाहिये....सगळा शहाणपणाचा मक्ता पुरुषांकडे नाहिये...!!!अगदी दारू पिणं, लग्नापूर्वीचे शरिरसंबंध (जे प्रेमाचेचंच व्यक्त स्वरूप आहे) याबद्दलही सोवळेपणाची भूमिका घेर्ण्याचा अट्टाहास सोडून विविधांगी गोंधळ व्यक्त करण्याचा प्रयत्न "मुरांबा" करतो....! "वेगळं " वागणाऱ्या आपल्या कारट्याला "बाब्या" म्हणून सोडायचं आणि तसंच करणाऱ्या परक्‍या तरूण मुलीला मात्र "Vamp" ठरवून मोकळं व्हायचं ; असा दुटप्पीपणा यातले आई-बाप करत नाहीत...!! 

ही पात्रं साकारणारे अभिनेतेही त्यामुळेच दिग्दर्शकाच्या नव्या धुमाऱ्यांना आपल्या सहज अभिनयातून प्रकट करतात.... "टिपिकल" वर्तणुकीची स्वतःच चेष्टा करत वेगळं वागू पहाणाऱ्या पात्रांना हे अभिनेते त्यांच्या साच्यांच्या बाहेर येऊन न्याय देतात..... 

सांगायचा मुद्दा इतकाच की- तुमची आमची घरं बदलताहेत... नाती बदलताहेत....स्त्री-पुरुष खूप उत्साहानं नवी क्षितीज शोधताहेत... नवे तरूण तर आकाश मुठीत घेऊ बघतायतंच पण आधली पिढीही या बदलांकडे सकारात्मक पहातीय.... प्रश्न हा आहे की हे बदल पडद्यावर आणायचे का नवा शोध घेणं नाकारणाऱ्या समाजाच्या भितीनं खोटा-खोटा चित्रपट बनवायचा.... त्या समाजाला आणखी जुनाट बनवणारी मूर्ख मालिका बनवण्याची हुषारी दाखवून आपल्या तिजोऱ्या भरायच्या.... 
आपलं मन, आपली प्रगत विचारसरणी, आपली प्रामाणिक आधुनिकता हसत-खेळत मांडण्याचं धारिष्ट्य या आमच्या मित्रानं दाखवलंय.... म्हणून ते लोभस आहे....आभासी मायाजालावर "मुरांब्या"च्या या गोडव्यावर देखील तिरकस शेरे वाचनात आले.... त्यांना इतकंच सांगावसं वाटतंय, की आपल्या स्वतःच्या मूल्यव्यस्थेशी फटकून चित्रपट बनवून प्रेक्षकांना खूष करणारी काही मंडळी आहेत, तर काही आपली मूल्यव्यवस्था मांडणारा चित्रपट करायला घाबरणारीही मंडळी आहेत.... 
"मुरांबा" चा लेखक-दिग्दर्शक त्याच्या मूल्य-व्यवस्थेशी प्रामाणिक आहे... कलावंत-तंत्रज्ञ इतकंच नव्हे तर निर्मात्यांपर्यंत त्यानं ती मूल्यव्यवस्था पोचवून ही कलाकृती जन्माला घातलीय..... आता प्रेक्षकांनाच हा असली माल हवा आहे की नाही हीच खरी कसोटी आहे...!! 

स्त्री आपल्या हक्कासाठी स्वतंत्र आस्तित्त्वासाठी उभी रहाते तेंव्हा तिला भांडकुदळ ठरवून नावं ठेवायला आपली कुटुंबव्यवस्था तयारच असते... आणि हे पहात पुरूष गप्प रहातो... पुरुष जेंव्हा नवी मूल्यं , समानेतेच्या गोष्टी करू लागतो तेंव्हा कुठे त्याकडे गंभीर पणे बघितलं जातं.... "मुरांब्या" तल्या स्त्री पात्रांकडून वेगळ्या वर्तणुकीची आणि पुरुष पात्रांकडून त्याकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी जेंव्हा एक पुरुष दिग्दर्शक मांडतो तेंव्हा त्याचं अधिक मोठं स्वागत करायला हवं... कारण त्यातूनच खरा बदल घडणार आहे....!! 

 

Web Title: article by Sunil Sukthankar on Muramba esakal news