माझी सई : 2 (गिरिजा ओक)

Girija Sai
Girija Sai

सेलिब्रिटी व्ह्यू 

...तर सई जितकी प्रेमळ आणि हळवी तितकीच मॅडपण आहे. एखाद्या नात्यात ती स्वतःला संपूर्णपणे समर्पित करते. त्या दरम्यान ती एका अशाच नात्यात होती. ते नातं ज्याच्याशी होतं तो माझा शाळेतला मित्र. त्या दोघांची ओळख माझ्यामुळेच झाली होती. सगळं छान सुरू असताना मला कळलं, की सई ही त्याच्या आयुष्यातली एकमेव मुलगी नाहीये. मला प्रचंड धक्का बसला आणि वाईटही वाटलं. मी तातडीनं ही गोष्ट सईला सांगितली. त्यावर सईचा विश्‍वासच बसेना. खूप चर्चेनंतर पुढे काय करायचं असं मी तिला विचारलं. त्यावर तिच्याकडं काही उत्तरही नव्हतं. पुढचे काही दिवस, किंबहुना महिने फार बरे नव्हते.

दरम्यान सईनं स्वतःची अशी काही समजूत घातली होती, की ती जाणूनबुजून झाला प्रकार विसरून जायचा प्रयत्न करत होती. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे तो आपल्याशी एकनिष्ठ नाही हे माहीत असूनही तिनं ते अमान्य केलं होतं. त्याच्याबद्दलचं हे सत्य तिला आठवायचं मला भेटल्यानंतर. मी सुद्धा तिला प्रत्येक वेळेस भेटून "तू अजूनही या माणसाबरोबर का आहेस?' हाच प्रश्‍न विचारायचे. या सगळ्यापासून पळ काढण्यासाठी म्हणा किंवा मला उत्तर देता येत नाहीये म्हणून म्हणा, सई माझ्यापासून स्वतःला दूर करू लागली. मला बदल जाणवत होता; पण मुळात माझा पिंड जाब विचारण्याचा नसल्याने मी पण तिला खडसावून विचारलं नाही, की तू स्वतःच स्वतःची हानी का करतेस? हा माझा आयुष्यातला सगळ्यात चुकलेला निर्णय. माझ्या एकमेव जिवाभावाच्या मैत्रिणीला माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा माझा अबोल स्वभाव, इगो आणि "मी का पुढाकार घ्यावा, ती चुकतेय' हे म्हणणं मध्ये आलं. आम्ही दुरावलो. तब्बल अडीच वर्षे आम्ही एकमेकींशी जवळपास बोललो नाही.

या दरम्यान माझ्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या. माझे आई-वडील वेगळे झाले, तिकडे सईचे वडील वारले. मी देखील अत्यंत त्रासदायक नात्यातून बाहेर पडले. सई पण त्या नात्यातून अंतिमतः बाहेर पडली आणि आम्ही दोघी आपापल्या आयुष्यात जरा स्थिरावले. पुन्हा एकदा आधीसारख्या भेटलो आणि एकमेकींच्या मदतीने सावरू लागलो. त्याच दरम्यान एकदा काही लोकांमध्ये गप्पा मारत मी बसले होते. त्यापैकी कोणीतरी सईच्या "बोल्ड चॉइस'बद्दल कॉमेंट केली. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी कळवळून म्हणाले "तिच्याबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही. तुमची मतं तुमच्याजवळ ठेवा. तुमच्यात नाही ना धमक एकीकडे स्क्रीनवर बिकिनी कॅरी करण्याची आणि दुसरीकडे "पोस्टकार्ड'सारख्या नॉन ग्लॅमरस अवतारात निव्वळ अभिनय कौशल्यावर भूमिका पेलण्याची, तर तुम्ही गप्पच बसलं पाहिजे.' मी हे ज्या वेगात बोलून गेले ना, माझं मलाच कळलं नाही की नेमकं मला काय झालं होतं. मला इतकं मात्र नक्की कळलं होतं, की हेच आता मला सईच्या समोर बोलून दाखवायची गरज होती. माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला हे शब्दात सांगायची गरज होती की "सई, तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस आणि मी कुठल्याही परिस्थितीत तुझा हात सोडणार नाही. तू माझं ऐकलं नाहीस तर मी एकवेळ तुला एक ठेवून देईन पण मला दिसत असताना तुला खड्ड्यात उडी मारू देणार नाही.'

अर्थात, सई आता पूर्वी इतकी इन्प्रॅक्‍टिकल राहिली नाहीये आणि मधून-मधून येणाऱ्या झटक्‍यांसाठी मी आहेच. मी मात्र तिच्यामुळे पूर्णपणे बदलून गेले आहे. फक्त आमचीच मैत्री नव्हे तर माझ्यात झालेल्या या बदलामुळे माझी इतर अनेक नाती अधिक घट्ट झाली आहेत. मैत्री या शब्दाची व्याख्या माझ्यासाठी बदलणाऱ्या या माझ्या सई नावाच्या सईची आज एक वेगळी ओळख मी करून दिली आहे. आजवर तिच्या कामावर आणि तिच्यावर जसं प्रेम करत आला आहात ते तसाच असू दे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com