मालिका ते चित्रपट व्हाया ग्रामीण नाटकं...!

मालिका ते चित्रपट व्हाया ग्रामीण नाटकं...!

गावातल्या मित्रांना घेऊन ग्रामीण नाटकं करायचो. पुढं आपल्याला जे मनापासून वाटतं, ते समाजासमोर आणलं पाहिजे, या उद्देशानं स्वतः लिखाणही सुरू केलं. अनेक एकांकिका, नाटकं सादर केली. त्यांना अनेक बक्षिसंही मिळाली. मराठी चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिकांतून मिळालेल्या संधींचंही सोनं केलं... ज्येष्ठ अभिनेते अशोक आडनाईक संवाद साधत असतात आणि एकूणच ग्रामीण नाट्यपरंपरेवरही ते भाष्य करतात.

गावगाड्यातलं सोंगी भजन असो किंवा ग्रामीण नाटकांची परंपरा. या परंपरेतून अनेक कलाकार मंडळी मराठी सिनेसृष्टीला आणि नंतरच्या काळात दूरचित्रवाणी मालिकांनाही मिळाली. पन्हाळा तालुक्‍यातील यवलूज परिसरातही ग्रामीण नाटकांची अशीच परंपरा. श्री. आडनाईक यांनी आपल्या मित्रांना घेऊन अनेक नाटकं रंगमंचावर आणली. मुळात पारंपरिक शेती सांभाळत त्यांनी हा छंद जपला.

आसुर्ले-पोर्ले येथील दत्त साखर कारखान्यात २२ वर्षे त्यांनी नोकरीही केली. गावातील विठ्ठल मंदिर देवस्थान समिती सचिव पदाची जबाबदारीही ते पार पाडतात. ‘क्राईम डायरी’ या मालिकेतून ते रूपेरी पडद्यावर झळकले आणि पुढे विविध चित्रपटांसह मालिकांतूनही त्यांनी अभिनय केला. ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘बायजाक्का’, ‘सासरची की माहेरची?’, ‘चंद्रभागा’, ‘पंढरीची वारी’, ‘काळभैरव’, ‘बत्ती गूल पॉवरफुल्ल’, ‘चिवटी’, ‘मधू इथे अन्‌ चंद्र तिथे’, ‘लॅंड १८९७’ आदी चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या.

‘क्राईम डायरी’ या मालिकेतील शंभरहून अधिक भागांमध्ये त्यांच्या भूमिका होत्या. त्याशिवाय ‘लक्ष्य’, ‘पंचनामा’, ‘बापमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांतही त्यांनी काम केलं. ‘निष्पाप’, ‘कर्ता करविता’, ‘कुर्यात पुन्हा टिंगलम्‌’, ‘अखेरचा सवाल’, ‘माझा कुणा म्हणू मी’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘समिधा’, ‘बळी’, ‘अबलख वेडा घोडा’, ‘शेवंता जिती हाय’, ‘जमेल तसं’, ‘उंबरठ्यावरी माप ठेविले’, ‘शिवा रामोशी’, ‘शेवटचा वैरी’, ‘एका घरात होती’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ आदी नाटकांतूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या. तीन एकांकिकांतूनही त्यांनी काम केलं. अभिनयाबरोबरच दिग्दर्शनासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले.          

वयाच्या बासष्ठीतही सळसळता उत्साह कायम आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच केवळ आवड म्हणून अभिनयात रमलो. आजही अनेक संधी येतात. त्यांचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मात्र, हे सगळं मिळालं ते गावगाड्यातल्या आमच्या नाटकांमुळेच. 
- अशोक आडनाईक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com