Ashok Saraf Birthday: 'अशोक सराफ' या एका नावाने मराठी इंडस्ट्रीला सोन्याचे दिवस दाखवले.. असा घडला महानायक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Saraf Birthday his movie struggle life style love life wedding family wife success

Ashok Saraf Birthday: 'अशोक सराफ' या एका नावाने मराठी इंडस्ट्रीला सोन्याचे दिवस दाखवले.. असा घडला महानायक..

Ashok Saraf birthday- मनोरंजन सृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह म्हणजे अभिनेते अशोक सराफ. मराठी मनोरंजन विश्वात त्यांना 'मामा' म्हणूनच ओळखले जाते. गेल्याच वर्षी त्यांचा 75वा वाढदिवास, संपूर्ण इंडस्ट्रीने अत्यंत जोरदार साजरी केली.

त्यांनी केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपट विश्वालाही आपल्या अभिनयाने वेड लावले. शेकडो चित्रपट करणारा हा कलाकार म्हणजे अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठच.. त्यांच्यापुढे भलेभले नट लीन होऊन राहतात. अशा अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस.

असं म्हणतात की अशोक मामांचे चित्रपट पाहायला लोक वेडे अक्षरशः रांगा लावायचे. त्यांच्या चित्रपटांची भुरळ आजही कमी झालेली नाही. मराठी चित्रपट सृष्टीला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या या अभिनेत्याचा थोडक्यात जीवनप्रवास आणि कारकीर्द पाहूया..

(Ashok Saraf Birthday his movie struggle life style love life wedding family wife success)

विनोदी भूमिका ही अशोक सराफ यांची मुख्य ओळख. याशिवाय काही चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या गंभीर भूमिकाही प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. प्रभावी हावभाव, लक्ष वेधून घेणारी संवादफेक, यामुळे अशोक मामांचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांना हवाहवासा वाटला.

4 जुन 1947 बेळगाव या गावी अशोक मामांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण मुंबईतील चिखलवाडीत गेले. त्यांचं शिक्षण मुंबईतल्या डीजीटी विद्यालयात झालं. पुढे ते ओघाओघाने मनोरंजन क्षेत्रात आले आणि इथलेच झाले.

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी वि वा शिरवाडकर यांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. जानकी या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपट क्षेत्रात उडी घेतली. त्यांनी नाट्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.

'प्रेमा तुझा रंग कसा..', 'हमीदाबाईची कोठी', 'मनोमिलन', 'संगीत संशयकल्लोळ', 'हसत खेळत', 'लगीनघाई' अशी कितीतरी नाटकं त्यांनी अजरामर केली.

1980 ते 1990 च्या दशकांत अशोक सराफ यांनी एका पेक्षा एक सरस चित्रपट केले. ते प्रेक्षकांना कमालीचे आवडले. अभिनयातील वेगवेगळे पुरस्कारही अशोक सराफ यांना मिळाले आहेत. 'पांडू हवालदार' 'एक डाव भुताचा', 'धुमधडाका', 'गंमत जंमत', 'अशीही बनवाबनवी', 'बिनकामाचा नवरा', 'एक गाव बारा भानगडी' यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय त्यांनी करण अर्जुन, येस बॉस या हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या होत्या.

मराठी चित्रपट विश्वामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होती. त्यांना प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला. विनोदी चित्रपटांची मोठी लाट या कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय केली होती.

अशोक सराफ यांनी आजवर 300 हून अधिक चित्रपट केले असून, त्यांना मनोरंजन विश्वातील अभिनयाचे विद्यापीठ बोलले जाते.

टॅग्स :ashok sarafnivedita saraf