सोशल कमेंट्‌सनी व्यथित झालो : अवधूत गुप्ते

टीम ई सकाळ
गुरुवार, 8 जून 2017

काही दिवसांपूर्वी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते अचानक चर्चेत आला. याचे कारण अचानक एका दिवशी अवधूत गुप्ते यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून शेतकरी संपाबाबत आक्षेपार्ह ट्‌विट आले. त्यानंतर सोशल मिडीयावर एकच गहजब उडाला.

मुंबई ; काही दिवसांपूर्वी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते अचानक चर्चेत आला. याचे कारण अचानक एका दिवशी अवधूत गुप्ते यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून शेतकरी संपाबाबत आक्षेपार्ह ट्‌विट आले. त्यानंतर सोशल मिडीयावर एकच गहजब उडाला. कमालीच्या वेगाने ते ट्‌विट पसरले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे आपण केलेले ट्‌विट नसून याकडे कृपया लक्ष देऊ नका असा सल्ला खुद्द अवधूत यांनी आपल्या अकाउंटवरून दिला. पण विषय शांत झाला नाही. लोकांच्या कमेंटस येतच होत्या. अखेर आता अवधूतने बुधवारी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली. 

या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना तो म्हणाला, 'माझे अकाउंट हॅक झाले नव्हते. तर कुणीतरी त्याचा स्नॅपशॉट काढून ते मॉर्फ केले होते. कारण त्या बनावट ट्‌विटमध्ये माझ्या अकाउंटला ब्ल्यू टिक दिसते. पण मला माझ्या अकाउंटला अद्याप अशी टिक नाही. शिवाय, तो फोटोही खोटा आहे. ज्यादिवशी हा प्रकार घडला त्यावेळी मी मुंबईत नव्हतो. दुसऱ्या दिवशी हा प्रकार मला कळल्यावर मी माझ्या अकाउंटवरून ही पोस्ट आपली नसून याकडे फार लक्ष देऊ नका असेही सांगितले. पण लोकांच्या कमेंटस थांबेनात. लोकांचा विश्‍वास बसेना. मी याने फार डिस्टर्ब झालो. त्यानंतर मात्र मी रीतसर तक्रार दाखल करायचे ठरवले. त्यानुसार आज सकाळी मी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आपण कसोशीने याचा छडा लावू असे सांगितले. '
 

 
 

Web Title: Avdhoot gupte twitter esakal news