esakal | '..तर मला इतरांकडे मागावी लागेल मदत'; अयुब खान यांनी मांडली व्यथा

बोलून बातमी शोधा

Ayub Khan
'..तर मला इतरांकडे मागावी लागेल मदत'; अयुब खान यांनी मांडली व्यथा
sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्याअंतर्गत मालिका, चित्रपटांच्या शूटिंगवरही बंदी घालण्यात आली. अन्य क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रालाही कोरोना महामारी आणि लॉकडाउनचा मोठा फटका सहन करावा लागतोय. अनेक कलाकारांना आर्थिक घडी बसवताना नाकीनऊ येतंय. चित्रपट आणि मालिकांमधील सुपरिचित चेहरा, अभिनेता अयुब खान यांनी नुकतीच त्यांची आर्थिक परिस्थिती एका मुलाखतीत मांडली. गेल्या दीड वर्षापासून त्यांना काम मिळत नसून जमा केलेले पैसेसुद्धा आता संपण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी सांगितलं. जर आणखी काही दिवस परिस्थिती अशीच राहिली तर त्यांना इतरांकडे मदत मागावी लागेल, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "आपण सर्वजण अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहोत. पण कृपा करून पुन्हा लॉकडाउन करू नका. देव न करो, जर मला आणखी एक वर्ष घरीच बसावं लागलं तर माझ्यावर खूप मोठं आर्थिक संकट येईल."

हेही वाचा : कोरोनाने बाबांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेची मनाला चटका लावून जाणारी पोस्ट

अयुब हे गेल्या २५ वर्षांपासून चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यांनी 'गंगाजल', 'एलओसी कारगिल' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. तर 'उतरन', 'शक्ती : अस्तित्व के एहसास की', 'रंजू की बेटियाँ' या मालिकांमध्येही त्यांनी दमदार काम केलं. नवीन मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग रखडल्याने अनेक कलाकारांना कामाची संधी मिळत नाहीये. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली नाही तरी माझ्यावर खूप मोठं आर्थिक संकट येईल, असं ५३ वर्षांचे अयुब म्हणतात.