'कटाप्पाने बाहुबलीला का मारलं'चं उत्तर झालं 'लीक'

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

'बाहुबली'च्या पहिल्या भागाने जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने एकूण 650 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तेलगु आणि तमिळ भाषांमध्ये चित्रित केला असून हिंदीमध्ये तो 'डब' करण्यात आला होता. 'बाहुबली'चा दुसरा भाग 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हैदराबाद: 'कटाप्पाने बाहुबलीला का मारले' या प्रश्‍नाचे उत्तर 'बाहुबली' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गोपनीय राखण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे. मात्र, तरीही चित्रपटाच्या टीममधीलच एकाने 'बाहुबली'च्या या रहस्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग असलेली नऊ मिनिटांची व्हिडिओ क्‍लिप 'लीक' केली. या प्रकरणी चित्रपट निर्मात्यांच्या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी एका ग्राफिक डिझायनरला ताब्यात घेतले आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली' या चित्रपटाने दणदणीत यश मिळविले होते. या चित्रपटाचा दुसरा आणि अंतिम भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. 'कटाप्पाने बाहुबलीला का मारले' या बहुचर्चित प्रश्‍नाचे उत्तर या भागात मिळणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशामुळे दिग्दर्शक राजामौली आणि त्यांच्या टीमने दुसऱ्या भागाविषयी अत्यंत गोपनीयता बाळगली आहे. या चित्रपटात प्रभास, राणा डुग्गुबाटी, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पण गेल्या काही दिवसांपासून 'बाहुबली 2'मधील युद्धाच्या प्रसंगातील नऊ मिनिटांची व्हिडिओ क्‍लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. 'बाहुबली'च्या शेवटच्या भागातील काही महत्त्वाची दृष्ये यात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी हैदराबादमधील 'अन्नपूर्णा स्टुडिओ'मधील एका ग्राफिक डिझायनरवर संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: 'Baahubali 2' war scene leaked online; Graphic designer arrested in Hyderabad