esakal | 'टेनिस बनेगा बॅडमिंटन'; 'सायना' चित्रपटामुळे परिणिती ट्रोल

बोलून बातमी शोधा

saina nehwal movie poster}

'टेनिस बनेगा बॅडमिंटन'; 'सायना' चित्रपटामुळे परिणिती ट्रोल

manoranjan
'टेनिस बनेगा बॅडमिंटन'; 'सायना' चित्रपटामुळे परिणिती ट्रोल
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. यामध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रा सायनाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. पोस्टरमधील एक चूक नेटकऱ्यांच्या लक्षात आली असून त्यामुळे या चित्रपटाला जोरदार ट्रोल केलं जातंय. या पोस्टरमध्ये बॅडमिंटनचं शटलमध्ये सायना हे नाव पाहायला मिळतंय. ते शटल सर्व्हिससाठी वर हवेत उडवण्यात आल्याचं पोस्टरमध्ये दिसतंय. मात्र याच चुकीकडे नेटकऱ्यांनी सिनेनिर्मात्यांचं लक्ष वेधलंय. 

बॅडमिंटनसाठी शटलची सर्व्हिस वर उडवून नाही केली जात, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. बॅडमिंटनचे सामान्य नियमसुद्धा माहित नाही का, अशाही शब्दांत या पोस्टरला ट्रोल केलं गेलंय. 'बॅडमिंटनचं सर्व्ह खालून केलं जातं. एका टेनिस चाहत्यानेच हा पोस्टर बनवला असावा', असं एकाने लिहिलं. तर 'हा सानिया मिर्झाचा बायोपिक आहे की सायना नेहवालचा', अशी खिल्ली दुसऱ्याने उडवली. 

हेही वाचा : अजय देवगणची गाडी रोखणाऱ्याला जामिन मंजूर

चित्रपटाच्या घोषणेपासूनच ग्रहण
'सायना' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून काही ना काही अडचणी येत आहेत. सुरुवातीला अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची भूमिका साकारणार होती. तिने या चित्रपटासाठी प्रशिक्षणालाही सुरुवात केली होती. मात्र काही दुखापतींनंतर तिने हा चित्रपट सोडून दिला. नंतर श्रद्धाच्या जागी अभिनेत्री परिणिती चोप्राला यामध्ये मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अमोल गुप्ते यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कूमार, कृष्ण कूमार, सूरज जसराज आणि राजेश शहा यांनी केली आहे. हा चित्रपट २६ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.